‘पॅरिस’वारी सुवर्णपदकाविना
ऑलिम्पिकमधील भारताचा प्रवास संपला : 1 रौप्य व 5 कांस्यपदकासह एकूण 6 पदकांची कमाई
वृत्तसंस्था/ पॅरिस
पॅरिस ऑलिम्पिक मधील भारताची मोहीम संपली आहे. शनिवारी भारताची कुस्तीपटू रितिका हु•ा 76 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पराभूत झाली. यानंतर सध्या सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचा प्रवास संपला आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 117 खेळाडूंनी सहभाग नोंदवले होता, ज्यामध्ये भारताच्या खात्यात एकूण 6 पदके आली, तर 7 व्या पदकाचा निर्णय अजून बाकी आहे. दरम्यान, ऑलिम्पिक पदकतालिकेत सहा पदकासह 71 व्या स्थानी राहिला. चीन व अमेरिका यांच्यात अव्वलस्थानासाठी चुरस असून शेवटच्या दिवशी याचा फैसला होईल.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण सहा पदके जिंकली आहेत. यामध्ये 5 कांस्य आणि एका रौप्यपदकाचा समावेश आहे. भालाफेकीत एक रौप्यपदक आले. तर नेमबाजीत तीन कांस्यपदके जिंकली, तर कुस्ती आणि हॉकीमध्ये भारताने प्रत्येकी 1 कांस्यपदक जिंकले. मात्र, कुस्तीपटू विनेश फोगाटच्या बाबतीत निर्णय भारताच्या बाजूने आल्यास पदकांची संख्या नक्कीच 7 होईल. विनेशच्या प्रकरणाचा निर्णय काहीही असो, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला एकही सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. आता विनेश फोगट प्रकरणी क्रीडा लवादाचा निर्णय मंगळवारी होणार आहे. क्रीडा लवादाच्या निर्णयानुसार भारताला 7 वे पदक मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सुवर्णपदकाशिवाय मोहिमेची सांगता
भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये पहिले पदक मिळाले. मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकले. त्यानंतर मनू भाकरनेही मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरे कांस्य मिळवले. सरबज्योत सिंग हा तिच्यासोबत या संघात होता. यानंतर स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत तिसरे कांस्यपदक जिंकले. स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक, भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्यपदक तर कुस्तीपटू अमन सेहरावतने पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाइलमध्ये कांस्यपदकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका गोल्डसह एकूण सात पदके जिंकली होती, जी भारताची एका ऑलिम्पिकमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये देशातील एकूण 117 खेळाडूंनी 16 खेळांमधील एकूण 69 पदक स्पर्धांमध्ये भाग घेतला. मात्र, भारताला नेमबाजी, अॅथलेटिक्स, हॉकी आणि कुस्तीमध्येच पदके जिंकता आली. इतर खेळामध्ये मात्र भारताच्या पदरी निराशा आली.
6 पदके जिंकली अन् 7 पदके गमावली
यंदाच्या प्ऑलिम्पिकमध्ये भारताला सहा पदकावर समाधान मानावे लागले तर भारताचे खेळाडू सहा वेळा चौथ्या स्थानावर राहिले. मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि मिश्र सांघिक प्रकारात सरबजोतसह कांस्यपदक पटकावले. मात्र महिलांच्या 25 मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात तिला कमी फरकाने चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. याशिवाय, पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत अर्जुन बबुटाने चांगली कामगिरी केली. मात्र, अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अगदी थोड्या फरकाने त्याचे पदक हुकले. तिरंदाजीत मिश्र सांघिक गटात धीरज बोम्मदेवरा व अंकिता भगत यांना कांस्यपदकाच्या लढतीत हार पत्कारावी लागली. तसेच नेमबाजीच्या स्कीट प्रकारात अनंतजीत सिंग व महेश्वरी चौहान यांचे पदक थोड्या फार फरकाने हुकले. बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन व वेटलिफ्टर मीराबाई चानू यांच्याकडून पदकाची अपेक्षा होती, या दोघांनीही संघर्ष केला पण त्यांना पदकापर्यंत पोहोचता आले नाही.
पदकतालिकेत चीन, अमेरिकेचे वर्चस्व, भारत 71 व्या स्थानी
दर चार वर्षाने रंगणारा ऑलिम्पिक सोहळा यंदा फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे पार पडला. जगभरातील तब्बल 10,500 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा, स्पर्धेदरम्यान उद्भवलेले वादाचे प्रसंग व इतर अन्य कारणांनी ही स्पर्धा गाजली. स्पर्धा संपण्यास एका दिवसाचा कालावधी बाकी असून पदकतालिकेत देखील मोठी चुरस दिसून आली. चीनचा संघ 40 सुवर्णपदकासह अव्वलस्थानी राहिला. चायनाने यंदा 40 गोल्ड, 27 रौप्य व 21 कांस्यपदकासह एकूण 91 पदके जिंकली. पदकतालिकेत नेहमीच अव्वल असणारा अमेरिकन संघ 39 गोल्ड, 44 रौप्य व 42 कांस्यसह एकूण 125 पदके जिंकत दुसऱ्या स्थानी राहिला. जपानने 20 गोल्डसह एकूण 45 पदके मिळवत तिसरे स्थान पटकावले. याशिवाय, ऑस्ट्रेलियाने 18 गोल्डसह चौथे तर यजमान फ्रान्सने 16 गोल्डसह पाचवे स्थान पटकावले. भारतीय संघ 1 रौप्य व 5 कांस्यपदकासह एकूण 6 पदके मिळवत 71 व्या स्थानी राहिला. याउलट पाकिस्तानने 1 गोल्डसह 62 वे स्थान पटकावले.
बाय बाय पॅरिस, सी यू लॉस एंजल्स 2028
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाच्या नेतृत्वाखाली फ्रान्सने यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेचे नेटात आयोजन केले. आयोजनापासून समारोपापर्यंत फ्रान्सने आपली ताकद दाखवून दिली. 26 जुलै तर 11 ऑगस्ट या कालावधीत अंत्यत नेटके आयोजन, स्पर्धेतील सुसज्जपणा, अतिउच्च तंत्रज्ञानाचा वापर, एआयसह कडेकोट सुरक्षा व्यवस्था यामुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा उत्तमरित्या पार पडली. आता, पुढील ऑलिम्पिक 2028 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजल्समध्ये होणार आहे. पुढील ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसह अनेक नव्या खेळांचा समावेश होणार असल्याने ही स्पर्धा निश्चितच रोमांचकारी होईल, असा विश्वास आयओएचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी केला. याशिवाय, बाय बाय पॅरिस, सी यू लॉस एंजल्स असा नाराही त्यांनी यावेळी दिला.