For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पॅरिस सेंट-जर्मेनचा मेस्सीच्या इंटर मियामीवर 4-0 ने विजय

06:29 AM Jul 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
पॅरिस सेंट जर्मेनचा मेस्सीच्या इंटर मियामीवर 4 0 ने विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ अटलांटा

Advertisement

क्लब वर्ल्ड कपमध्ये जोआओ नेव्हेसने पॅरिस सेंट-जर्मेनसाठी दोन गोल केले आणि जगातील सर्वोत्तम संघाने खेळातील एका महान खेळाडूच्या म्हणजे लिओनेल मेस्सीच्या आव्हानावर मात करत इंटर मियामीला उपउपांत्यपूर्व फेरीत 4-0 असे पराभूत केले.

मेस्सीने त्याच्या उत्कृष्ट कारकिर्दीच्या संध्याकाळात मेजर लीग सॉकरमध्ये जाण्यापूर्वी दोन हंगाम घालवलेल्या संघाचा या लढतीत सामना केला. युरोपियन चॅम्पियन्स असलेल्या पॅरिस सेंट-जर्मेनने अटलांटाच्या मर्सिडीज-बेंझ स्टेडियमवर 65,574 लोकांच्या गर्दीसमोर एक मोठा धक्का देण्याच्या मेस्सीच्या आशा लवकरच धुळीस मिळवल्या. नेव्हसने सामना सुरू होऊ अवघी सहा मिनिटे झालेली असताना फ्री किकवरील हेडरचे रूपांतर करून आपला पहिला गोल केला.

Advertisement

या पोर्तुगीज मिडफिल्डरने त्यानंतर 39 व्या मिनिटाला आणखी एक गोल केला. त्यानंतर पहिल्या सत्राच्या शेवटच्या टप्प्यात इंटर मियामी हडबडून जाऊन त्यांनी स्वयंगोल स्वीकारला. हे कमी म्हणून की काय, नंतर अचराफ हकिमीने स्टॉपेज वेळेत गोल करून ‘पीएसजी’ची आघाडी चार गोलांवर नेली. हा निकाल एका महिन्यापूर्वी चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत पीएसजीने इंटर मिलानवर मिळविलेल्या 5-0 अशा ऐतिहासिक विजयाची आठवण करून देणारा होता. त्यावेळी पॅरिस क्लबने पहिले युरोपियन जेतेपद जिंकताना क्लब विश्वचषकाचा भक्कम दावेदार म्हणून स्वत:ला प्रस्थापित केले होते.

या सामन्यात गुलाबी पोशाख घातलेल्या चाहत्यांनी अधूनमधून मेस्सीच्या नावाचा जयघोष करून त्याला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. अर्जेंटिनाच्या या स्टारने पहिल्या सत्राचा बराचसा वेळ फक्त मिडफिल्डमध्येच घालवला. पीएसजीच्या खेळाडूंनी तो वेढला गेला आणि चेंडूला स्पर्श करण्याची संधीच त्याला मिळाली नाही.

Advertisement
Tags :

.