For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘स्वप्नील’च्या स्वागतासाठी अवघं कोल्हापूर रस्त्यावर! हेलिकॉप्टरसह मिरवणुकीत पुष्पवृष्टी

11:13 AM Aug 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
‘स्वप्नील’च्या स्वागतासाठी अवघं कोल्हापूर रस्त्यावर  हेलिकॉप्टरसह मिरवणुकीत पुष्पवृष्टी
Swapnil Kusale arrived Kolhapur
Advertisement

हलगी-लेझीम अन् झांजपथकांचा झंजावात; ताराराणी चौक ते दसरा चौकपर्यत जंगी मिरवणूक; दुतर्फा नागरिकांची गर्दी

कोल्हापूर प्रतिनिधी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक पटकावलेल्या स्वप्नील कुसाळेचे बुधवारी सकाळी कोल्हापुरात आगमन झाले. ऑलिम्पिकवीर स्वप्निलच्या स्वागतासाठी अवघं कोल्हापूर रस्त्यावर अवतरले. जिल्हा प्रशासनाने ताराराणी चौक ते दसरा चौक या मिरवणूक मार्गावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. दुतर्फा थांबलेल्या कोल्हापूरकर आणि विद्यार्थ्यांनी नॉनस्टॉप पुष्पवृष्टी करत ‘वेलकम चॅम्प’ अशा शब्दांत लाडक्या स्वप्नीलचे न भुतो न भविष्यती असे स्वागत केले. स्वागत मार्गावर हलगी, लेझीम, ढोलताशा, झांजपथकासह जोषपूर्ण वाद्यांच्या गजरात शिस्तबध्द निघालेली मिरवणूक डोळ्यांचे पारणं फेडणारे ठरली.

Advertisement

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदकावर नाव कोरल्यावर समस्त कोल्हापूरकरांची छाती अभिमानाने भरुन आली. पॅरिसहून स्वप्नील कोल्हापूरला येताच त्याच्या जंगी स्वागताचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले होते. या पार्श्वभूमीवर स्वप्नील दहा दिवसांपूर्वी कोल्हापुरात येणार असल्याचे स्पष्ट झाले. ताराराणी चौकातून दसरा चौकापर्यंत स्वप्नीलची हत्तीवरुन मिरवणूक काढण्याचे ठरले. मात्र काही कारणाने हा बेत रद्द झाला. स्वप्नीलच्या कांबळवाडीतील गावकऱ्यांनी राधानगरी तालुक्यात त्याची अजून जंगी मिरवणूक काढण्याचे नियोजन केले. स्वप्नीलच्या कामगिरीला साजेसं स्वागत असावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने कसून तयारी केली. हत्तीवरुन मिरवणूक रद्द झाल्यावर हेलिकॉप्टरमधून मिरवणूक मार्गावर पुष्पवृष्टी करण्याचे ठरले.

स्वप्नील पुण्याहून सकाळी नऊ वाजता कोल्हापुरात दाखल होणार होता. त्यानुसार सकाळी आठ वाजल्यापासून दसरा चौक ते ताराराणी चौक मार्गावर दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी हातात फुले घेऊन थांबले होते. ताराराणी चौकात पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.

Advertisement

स्वप्नीलच्या मिरवणुकीसाठी फुलांनी सजवलेली गाडी तसेच मोठ्या क्रेनव्दारे सुमारे 25 फुट फुलांचा हार सज्ज ठेवला होता. पावणेदहा वाजता ऑलिम्पिकची निळ जर्सी परिधान केलेल्या स्वप्निलचे आगमन झाले. यावेळी फटाक्याची जोरदार आतषबाजी केली. स्वप्नीलला कोल्हापुरी फेटा बांधण्यात आला. त्यानंतर स्वप्नीलने आई अनिता कुसाळे, वडील सुरेश कुसाळेंसह करवीर संस्थापिका महाराणी ताराराणींच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर ओपन टपाच्या जीपमधून त्याने उपस्थितांना अभिवादन करताच एकच जल्लोष झाला अन् स्वप्नीलची मिरवणूक दसरा चौकाकडे निघाली.

मिरवणूक मार्गात हलगीचा कडकडाट, झांजपथकाचा झंझावात, ढोल-ताशांच्या गजरात लेझीमवर ताल धरलेल्या विद्यार्थिंनीसह दुतर्फा होणारी पुष्पवृष्टी असे जल्लोषी वातावरणात होते. ओपन टफ गाडीतून स्वप्नील, त्याचे आई-वडील कोल्हापूरकरांना अभिवादन करत होते. स्वप्नीलने गळ्यात ऑलिम्पिकचे कांस्यपदक अडकवले होते. एका हातात पदक आणि दुसरा हाताने तो अभिवादन करत होता. त्याच्या गाडीपुढे पाच सजवलेलं घोडे होते. त्यापुढे झांजपथक आणि वाद्यवृंद होता. दुतर्फा थांबलेले विद्यार्थी अखंडपणे स्वप्नीलवर पुष्पवृष्टी करत होते. कोल्हापूरकर मोबाईलमध्ये मिरवणुकीची छबी घेऊन आप्तस्वकियांना सोशल मिडीयाव्दारे फॉरवर्ड करत होते. अनेकजण स्वप्नील दिसेल, अशी लांबून सेल्फी घेत होते.

दरम्यान, मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधूनही पुष्पवृष्टी सुरू होती. मिरवणुकीत सुनो जोर से दुनियावाले.., सबसे आगे होंगे हिंदुस्थानी.., च्या धुनवर तरुणाई थिरकत होती. पेपरब्लास्टिंग मशिनमधूनही मिरवणूक मार्गावर वर्षाव सुरू होता. अत्यंत जल्लोषी वातावरणात मिरवणूक साडेअकराच्या सुमारास दसरा चौकात आली. येथे स्वप्नीलने राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले अन् मिरवणुकीची सांगता झाली. दरम्यान, हेलिकॉप्टरमधून सुमारे 15 मिनिटं चौकात पुष्पवृष्टी सुरू होती. दसरा चौक मैदानावर मान्यवरांच्या हस्ते स्वप्नील कुसाळेचा सत्कार करण्यात आला.

मिरवणूक मार्गावर फुलांचा सडा
ताराराणी चौक ते दसरा चौक दरम्यान संपूर्ण मार्गावर पावणेदहा ते सव्वाअकरा वाजेपर्यंत मिरवणुकीचा जल्लोष सुरू होता. ध्रम्यान, राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयासमोर मिरवणुकीवर जोरदार पुष्पवृष्टी अन् फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. स्वप्नीलच्या हातून तिरंगी फुगे आकाशात सोडले. ताराराणी चौक, मध्यवर्ती बसस्थानक, दाभोळकर कॉर्नर, रेल्वे स्टेशन, व्हिनस कॉर्नर मार्गावरुन मिरवणूक आली. या संपूर्ण मार्गावर फुलांचा सडा आणि पेपरब्लास्टिंगमधून सोडलेल्या सप्तरंगी पेपरचा खच पडला होता. प्रत्यक्ष मिरवणुकीत सहभागी होत तसेच सोशल मिडीयावरील व्हिडीओतून समस्त कोल्हापूरकरांनी हा अभिमानास्पद क्षण अनुभवला.

कोल्हापूरचा ढाण्या वाघ..!
वेल कम स्वप्नील... कोल्हापूर ढाण्या वाघ स्वप्नील, कोल्हापूरचा अभिमान स्वप्नील..., स्वप्नील यशस्वी भव.., जगात भारी कोल्हापुरी., चक दे..! कोल्हापूर..., जिंकलास भावा..., स्वप्निलचा जय हो..! त्रिवार अभिनंदन... असे फलक घेऊन कोल्हापूरकर मिरवणुकीत सहभागी झाले. मिरवणूक मार्गावरील हे फलक लक्षवेधी ठरले.

Advertisement
Tags :

.