‘रिपोर्टिंग लाइव’मध्ये परिणिती चोप्रा
अभिनेत्री परिणिती चोप्राची शक ही वेबसीरिज अलिकडेच ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजला प्रेक्षकांची पसंती लाभत आहे. तर आता तिचा नवा चित्रपट जाहीर झाला असून याचे नाव रिपोर्टिंग लाइव असणार आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लुक पोस्टरसोबत त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
नेटफ्लिक्सवर हा चित्रपट 9 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. रिपोर्टिंग लाइव हा चित्रपट ऑनलाइन स्ट्रीम करण्यात येणार आहे. या चित्रपटात परिणिती ही संध्या नावाच्या महिला पत्रकाराची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. यात ती स्वत:च्या कॅमेरामनसोबत मिळून अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांचा पर्दाफाश करताना दिसून येणार आहे.
हा एक प्रकारचा इन्व्हेस्टिगेटिव्ह थ्रिलर धाटणीचा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती पार्थ ठाकूर आणि जोशुआ शिरसाट यांनी केली आहे. तर याचे दिग्दर्शन आणि लेखनाची जबाबदारी ध्रूव त्रिपाठी आणि मिहिर जाधव यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात परिणितीसोबत देवेन भोजानी, अमोल पालेकर, आदिल हुसैन, शेखर सुमन हे कलाकार दिसून येणार आहेत.
