गुरूकुल स्कूलमध्ये भरणार आता ‘पालकांची शाळा’
सातारा :
गुरूकुल एज्युकेशन सोसायटी संचलित गुरूकुल स्कूल या इंग्रजी माध्यम शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच नाविण्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत असतात. यामध्ये प्रामुख्याने वीज बचत अभियान, एक मूठ धान्य, चमी स्कूल बॅग, गणवेशाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणे असेल, सदर उपक्रम मागील 10 ते 12 वर्षापासून सातत्याने सुरू आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्यात सकारात्मक बदल दिसून आले आहेत. याच अनुषंगाने गुरूकुल स्कूलच्या व्यवस्थापनाने पालकांशी संवाद साधत चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची शाळा सातारच्या प्रसिध्द डॉ. चित्रा दाभोलकर, लेखिका डॉ. आदिती काळमेख व मानसमित्र अतुल शहा यांच्या सहभागाने सुरू करण्यात येणार आहे, असे गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी पालकांच्या झालेल्या सभेत सांगितले.
यावेळी सचिव आनंद गुरव, कु. ऐश्वर्या चोरगे, माध्यामिक विभागाच्या मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुराधा कदम, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका सोनाली तांबोळी, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे व पालक शिक्षक सदस्य उपस्थित होते.
आजच्या धावपळीच्या जीवनपध्दतीमुळे काही ठिकाणी आई-वडील दोघेही नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेत असतात. तसेच विभक्त कुटुंब पध्दतीमुळे घरातील ज्येष्ठांचा अभाव यामुळे बऱ्याचवेळा पाल्य घरात एकटेच असते. तसेच आजच्या इंटरनेट व सोशल मीडियाच्या युगात मुलांना सहज उपलब्ध होणारा स्मार्टफोन, पालक व मुलांच्यात कमी झालेला संवाद, मुलांना भेडसावणाऱ्या सामाजिक समस्या या अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भावनांचा कल्लोळ सुरू असल्याचे जाणवत आहे. हार्मोन्समधील बदल यामुळे मुलांचे चिडचिड होण्याच्या प्रमाणात झालेली वाढ, खोटे बोलणे, चंगळवादाचा ओढा यामुळे मुलांचे संगोपन करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे.
यावेळी गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी सांगितले की, या सर्व बाबींचा गांभिर्यपुर्वक विचार केल्यावर असे निदर्शनास आले की, सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये पालकांनी मुलांसोबत कसा संवाद साधावा, मुलांच्यात होणारे नैसर्गिक, मानसिक व सामाजिक बदल समजून घेण्यासाठी पालकांनाच आज प्रशिक्षित करणे गरजेचे असल्याचे जाणवत आहे. गुरूकुल स्कूलच्यावतीने सुरू करण्यात येत असलेल्या पालकांच्या शाळेमध्ये खालील प्रकारचे उपक्रम प्रथम स्तरावर राबविण्यात येणार आहेत.
यावेळी ‘पालकांची शाळा’ हा उपक्रम कदाचित देशातील पहिलाच उपक्रम असू शकतो, असे मत व्यक्त केले. या उपक्रमामुळे नक्कीच शाळेला व पालकांना अपेक्षित असलेले विद्यार्थी पडविले जातील असा आम्हास विश्वास आहे.
पालकांच्या शाळेत होणार अनेक समस्यांचा उहापोह
किशोर अवस्थेतील विविध क्षेत्रातील बाल व विकास, समस्या, त्रुटी जाणून घेण्यासाठी मुलांचे संगोपन, संगोपनातील मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक वर्तन याबाबत होणारे बदल. मुलांच्यात एकाग्रता नसणे, सतत चिडचिड करणे, मोबाईल सोशल मिडियाचा गैरवापर अभ्यास न करणे, खोटे बोलणे व्यसनाधिनता, या सारख्या अनेक समस्यांचा उहापोह व मार्गदर्शन पालकांना करण्यात येणार आहे.