पालक जनआरोग्य संरक्षण समिती
कोल्हापूर / दीपक जाधव :
विस्तारित महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत व प्रधान मंत्री जनआरोग्य योजनांची प्रभावीपणे अंमलबाजवणी व्हावी, यासाठी प्रत्येक जिह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पालक जनआरोग्य संरक्षण समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. योजना 10 जुले, 2024 पासून राज्यात लागू करण्यात आली. जिल्हा संनियंत्रण व तक्रार निवारण समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. नव्याने विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, याकरिता संबंधित जिह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पालक जनआरोग्य संरक्षण कार्यकारिणी गठीत करण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत पालकमंत्री अध्यक्ष तर सदस्य म्हणून जिल्हातील खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, महानगरपालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिका, जिल्हा आरोग्य अधिकारी तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक असणार आहेत. पालकमंत्री अध्यक्ष म्हणून या समितीत अन्य विभागांचे शासकीय अधिकारी, पदाधिकारी व तज्ञांना ‘विशेष निमंत्रित’ म्हणून घेऊ शकतात.
- समितीचे काम असे चालणार...
1) जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विस्तारीत महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनांचा आढावा घेणे.
2) योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा सनियंत्रण, तक्रार निवारण समितीच्या कामाचा आढावा घेणे.
3) योजनेंतर्गत लाभार्थ्यांकडून प्राप्त तक्रारींचा आढावा घेऊन त्यांच्या निवारणासाठी जिल्हा संनियंत्रण, तक्रार निवारण समितीला निर्देश देणे.
4) योजनेची संपूर्ण जिह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीला आवश्यक सूचना, मार्गदर्शन करणे.
5) योजनेचा प्रचाराबाबत आढावा, समितीची बैठक दर 3 महिन्यांनी घेणे.