शिक्षकदिनी पालकांचा संताप, मनपा शाळेला ठोकले टाळे; शिक्षकाच्या बदलीला विरोध
सांगली : शिक्षक दिनाच्या दिवशीच महापालिका शाळा क्रमांक 22 मधील पालकांनी शिक्षक निलेश सोनवणे यांच्या बदलीविरोधात आक्रमक भूमिका घेतली. सोनवणे यांची शाळा क्रमांक 23 येथे करण्यात आलेली प्रशासकीय बदली रद्द करून त्यांची पुन्हा शाळा क्रमांक 22 मध्ये नियुक्ती करावी, या मागणीसाठी पालकांनी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला.
निलेश सोनवणे हे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असून, त्यांच्या अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासातील सहभाग वाढला असल्याचे पालकांनी सांगितले. अचानक करण्यात आलेल्या बदलीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता असून, बदलीचा निर्णय घेताना प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केलेला नाही, असा आरोप पालकांनी केला.
"बदली रद्द होईपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही," असा पवित्रा पालकांनी घेतला. त्यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेतून घरी नेले. या आंदोलनामुळे काही काळ शाळा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
जिल्हाध्यक्ष अरुण आठवले यांनी सोनवणे यांची बदली तातडीने रद्द न केल्यास प्रशासनाविरोधात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. विद्यार्थिनी श्रीश्या मयूर आठवले हिनेही सोनवणे सरांची शिकवण्याची पद्धत चांगली असून, त्यांना याच शाळेत कायम ठेवावे, अशी मागणी केली. पालक संगीता कांबळे यांनीही बदलीच्या निर्णयाचा निषेध केला.
या आंदोलनात बाळू पवार, संगीता कांबळे, नीता कांबळे, मीनाक्षी कांबळे, अश्विनी सानकर, सुनील कांबळे, मयूर आठवले यांच्यासह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.