पालकांनो मुलांवर आंधळा विश्वास नको !
शिक्षकांनी मुलांबाबत सांगितलेल्या माहितीची पडताळणी करणे आवश्यक : मुलांच्या वर्तणुकीतील वास्तवता जाणून घेण्याची गरज : नोकरीत व्यस्त असलेल्या पालकांकडून मुलांकडे दूर्लक्ष : व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या मुलांना वेळीच रोखणे अत्यावश्यक
कृष्णात चौगले /कोल्हापूर
तुमचा मुलगा शाळेत सतत गैरहजर असतो. त्याच्या वर्तनात खूप बदल झाला असून तो विचित्र वागतो. शाळेतील इतर मुलांना तो सिगारेट ओढताना अनेकदा दिसला असल्याची धक्कादायक माहिती एक दिवस शिक्षकांकडून पालकांना सांगितली जाते. पण तुम्ही आमच्या मुलांवर आरोप करताय ? चुकीची माहिती सांगून आमच्या मुलास बदनाम करत आहात ? असा आरोप संबंधित पालकांकडून शिक्षकांवरच केला जातो. पण हे कटूसत्य पालकांनी शांतपणे समाजावून घेऊन आपला मुलगा खरोखरच गैरमार्गावरून चालला आहे काय ? याची पडताळणी करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा आपल्या मुलांवरील आंधळ्या विश्वासाने तो व्यसनामध्ये गुरफटत जाण्याचा अधिक धोका आहे. हे एका शाळेतील प्रातिनिधीक उदाहरण असले तरी जिह्यात सर्वत्र हेच चित्र पहावयास मिळण्याची शक्यता आहे.
‘तरुण भारत संवाद’ मध्ये ‘शाळकरी मुलांना व्यसनांची लागण’ या मथळ्याखाली सोमवारी वृत्त प्रसिद्ध झाले. या वृत्तामधून समाजातील वास्तव चित्र मांडले असल्याबाबतच्या प्रतिक्रिया जनसामान्यांतून उमटल्या. यामध्ये पालक आणि मुले तसेच पालक आणि शिक्षकांमधील विसंवादामुळे मुलांकडे कशा पद्धतीने दुर्लक्ष होत चालले आहे, याबाबतच्या अनेक प्रतिक्रिया ‘तरुण भारत संवाद’च्या प्रस्तुत प्रतिनिधींकडे व्यक्त करण्यात आल्या.
विशेषत: सर्वच शाळांतील मुलांना एकमेकांबद्दल माहिती असते. त्यामुळे कोण काय करतो ? कसा वागतो ? एकमेकांच्या खोडी काय आहेत ? याची सर्व माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचत असते. काही चाणाक्ष शिक्षक तर मुलांच्या वर्तनावरूनच त्याच्या मनात काय गोंधळ सुरु आहे, कोणत्या मार्गाने त्याची वाटचाल सुरु आहे ? याचा अंदाज बांधतात. त्याबाबतची सत्यता जाणून घेतल्यानंतर वास्तव समोर येतो. हेच वास्तव शिक्षकांनी पालकांना सांगितल्यानंतर त्यांच्याकडून शिक्षकांनाच खडे बोल सुनावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण हे जबाबदार पालकाचे लक्षण नसल्यामुळे वाईट मार्गावरून सुरु असलेले त्यांच्या मुलाचे मार्गक्रमण अखंडीतपणे सुरुच राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.
व्यस्त पालक अन् बिघडणारी मुले
सर्व पालकांना त्यांच्या मुलांचा अभिमान आहे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु आजच्या काळात पालकांनी मुलांच्या चांगल्या-वाईट सर्व कामांकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मुलांमध्ये नशेच्या वाढत्या प्रमाणाला सर्वात मोठे दोषी पालक आहेत. जर वेळीच मुलांना योग्य मार्गदर्शन आणि सोयीस्कर संगोपण मिळाले तर वाईट परिस्थिती उद्भवणार नाही. मुलांची दैनंदिन दिनचर्या, त्यांचे मित्र, वर्गमित्र, मुले कोणाला भेटतात, कुठे येतात-जातात, त्यांचा वेळ कुठे आणि किती घालवतात हे पालकांनी जाणून घेतले पाहिजे. मुलांचे पालकांशी खोटे बोलणे आणि बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतण्याचे प्रमाण आजकाल खूप वाढले आहे. अंमली पदार्थांकडे वाटचाल करणारी तरुण पिढी समाजासाठी शाप ठरत आहे. या वयात मुलांना अधिक हाताळणीची आवश्यकता असते. पालकांचा व्यस्ततेचा बहाणा आणि मुलांवरचा त्यांचा आंधळा विश्वास मुलांच्या येणाऱ्या उज्वल भविष्याला उद्ध्वस्ततेकडे वळवण्याचा गंभीर धोका आहे.
मुलांशी दिलखुलास संवाद साधणे गरजेचे
मुलांना बोलण्यात किंवा वागण्यात कसलाही संकोच वाटू नये म्हणून पालकांनी त्यांच्याशी मित्रासारखे वागवणे आवश्यक आहे. मुलांसोबत वेळ घालवून त्यांचे वर्तन , जिज्ञासा आणि स्वभावानुसार त्यांना समजून घेणे, खोटा देखावा टाळून त्यांच्याशी जीवनातील चांगल्या-वाईट गोष्टी, अनुभव पालकांनी शेअर करणे आवश्यक आहे. आजची मुले ही उद्याच्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. हीच पीढी आज अंमली पदार्थांच्या आहारी जात आहे. त्यांना अंमली पदार्थांपासून वाचवण्याची जबाबदारी पालकांची असून त्यांचे आद्य कर्तव्य आहे. पालकांबरोबरच शिक्षक, समाज आणि सरकारची जबाबदारीही खूप महत्त्वाची आहे.