सावरवाड प्राथमिक शाळेत शिक्षक नसल्याने पालकांची गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे धाव
सावंतवाडी / प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सांगेली सावरवाड येथील इयत्ता सहावी व सातवीच्या वर्गांसाठी पदवीधर शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शाळेतील गणित व विज्ञान विषयाचे पदवीधर शिक्षक सुनील परशुराम करडे यांना पुन्हा मूळ शाळेत हजर करून घ्यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पालकांच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी एस. जी. शेर्ले यांची भेट घेऊन दिला.
पालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाळेतील पदवीधर शिक्षक सुनील परशुराम करडे हे सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग येथे उसनवारी तत्त्वावर कार्यरत आहेत. त्यामुळे शाळेत इयत्ता सहावी व सातवीसाठी पदवीधर शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.
सध्या कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त वर्गांचा भार असून सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक वेळ देणे शक्य होत नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे करडे यांना तातडीने पुन्हा शाळेत रुजू करून घ्यावे किंवा पर्यायी पदवीधर शिक्षक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी माजी सभापती रवींद्र मडगावकर, सरपंच देवयानी पवार, सविता ठाकूर, अमृता काळे, अनिता सावंत, कविता पाटील, रूपाली देऊळकर, शीतल कुडतरकर, तन्वी कुडतरकर, विलास मोरजकर, साईनाथ देऊळकर यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी एस. जी. शेर्ले यांनी, "या संदर्भात वरिष्ठ स्तरावर तातडीने पत्रव्यवहार करण्यात येईल. तसेच शाळेला आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील," असे आश्वासन पालकांना दिले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन शाळेस तातडीने एक अतिरिक्त पदवीधर शिक्षक उपलब्ध करून द्यावा, तसेच निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक व तातडीने विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.