पालक-बालक-शिक्षक आनंद मेळावा उत्साहात
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे आयोजन : दोन दिवशीय मेळाव्यात मान्यवरांकडून पालक-बालकांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी संचालित ‘मराठी भाषा साहित्य व संस्कृती संवर्धन समिती’च्यावतीने दोन दिवशीय पालक, बालक व शिक्षक आनंद मेळावा नुकताच झाला. पहिल्या दिवशी ‘बोलू कौतुके’ या सत्रामध्ये पुण्याच्या लेखिका अद्वैता उमराणीकर यांनी ‘पालकांसमोरील आजची आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन केले. बालभारतीचे संपादक किरण केंद्रे यांनी बालकांचे शिक्षण या विषयावर व्याख्यान दिले. डॉ. आसावरी संत यांनी आजच्या वर्तमानात पालकांनी घ्यावयाची काळजी याबद्दल विचार मांडले.
आयोजन व अध्यक्षा डॉ. शोभा नाईक यांनी मुलांना घडवताना भाषातत्त्वाबद्दल विवेचन केले. परीक्षक मुकुंद गोरे, रूपा पै, राजश्री देसाई, नमिता सावंत, पिराजी लोहार, कविता गांगुर, शोभा लोकूर, ऐश्वर्या मुतालिक-देसाई या परीक्षकांचा सत्कार करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी ‘कवयित्री तुमच्या भेटीला’ सत्रामध्ये डॉ. संगीता बर्वे यांचे काव्य वाचन झाले. तसेच राजीव बर्वे व प्रांजली बर्वे यांची मैफल झाली. गेले चार महिने समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या स्पर्धांतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुस्तक देण्यात आले. या कार्यक्रमासाठी लोकमान्यचे पीआरओ सत्यव्रत नाईक व समन्वयक सुनील तलवार यांचे साहाय्य लाभले. सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय सुनीता राक्षे व छाया सुतार यांनी करून दिला.
या कार्यक्रमात महाराष्ट्र हायस्कूल येळ्ळूर, बेकीनकेरे, बालिका आदर्श, ज्ञानप्रबोधन मंदिर, सेंट पॉल्स स्कूल, सेंट मेरी स्कूल, केएलएस, जी. जी. चिटणीस, अंगडी, आदर्श विद्या मंदिर शहापूर, शानभाग व भंडारी शाळा, मराठी विद्यानिकेतन, महिला विद्यालय, बेनकनहळ्ळी हायस्कूल, हेरवाडकर शाळा, न्यू इंग्लिश हायस्कूल मुतगे इत्यादी शाळांच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. चुरशीने झालेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.