Kolhapur Crime : कोल्हापूरमध्ये पार्सल डिलिव्हरी बॉयचा कंपनीला गंडा !
कोल्हापूरमध्ये ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीकडून कंपनीची ₹2.06 लाखांची फसवणूक.
कोल्हापूर : नामांकित इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे पार्सल मागवून त्यातील वस्तू आपल्याकडे ठेवून कंपनीला रिकामे बॉक्स रिटर्न करणाऱ्या ऑनलाईन कंपनीच्या डिलिव्हरी बॉयसह त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला.या दोघांनी मिळून २ लाख ६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले.
अभय महेश करनूरकर (रा. सिद्धार्थनगर) व अमीर सोहेल मकानदार (रा. केसापूर पेठ, जुना बुधवार) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद प्रकाश रतिलाल शहा (वय ६४ रा. बिबवेवाडी पुणे) यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित अभय करनूरकर हा ऑनलाईन करणाऱ्या कंपनीमध्ये कामास आहे. त्याने मित्र अमीर मकानदारचा मोबाईल वापरून वेगवेगळ्या कंपन्यांकडून २७ फेब्रुवारी ते १५ मे दरम्यान महागडे मोबाईल, डिजिटल वॉच, एअरपॅड ऑर्डर केले होते.
या वस्तूंची डिलिव्हरी आल्यानंतर तो पार्सल आमीरला देत होता. हे पार्सल रिकामे आले असल्याचे कंपनीला सांगून ते परत पाठवत होता. आणि बॉक्समधील वस्तू स्वतःकडे ठेवत होता. असा प्रकार वारंवार अभयच्या बाबतीतच होत असल्याची बाब फिर्यादी प्रकाश यांच्या निदर्शनास आली.
त्यांनी सीसीटीव्हीच्या आधारे या गोष्टीची माहिती घेतली असता, फसवणुकीचा प्रकार समोर आला. त्यांनी याबाबतची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.
पार्सलमधील वस्तूंची परस्पर विक्री
संशयित अभयने पार्सलमधून मागविलेल्या मोबाईल, डिजीटल वॉच, एअरपॅड यांची विक्री केली आहे. ५० टक्के किंमतीमध्ये या वस्तू विकल्याची माहिती समोर आली आहे.