परमवीरचक्र विजेते योगेंद्रसिंह यादव यांचे उद्या मार्गदर्शन
सिंधुदुर्ग : ऐतिहासिक कारगिल युद्धात जीवाची पर्वा न करता पाकिस्तानी सैन्यावर तुटून पडत टायगर हिल जिंकून देणारे परमवीरचक्र विजेते महापराक्रमी योद्धा सुभेदार योगेंद्रसिंह यादव खास सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सावंतवाडीत येत आहेत. तरुण भारत, लोकमान्य को-ऑप. संस्था, लोकमान्य एज्युकेशन आणि सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जून रोजी ‘गाथा शौर्याची’ या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 22 रोजी सकाळी 8.45 वा. सावंतवाडी नगरपालिकेमध्ये या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अतिथी म्हणून सावंतवाडी संस्थानचे महाराज बाळराजे, महाराणी श्रीमती शुभदादेवी व नगरपालिका मुख्याधिकारी सागर साळुंखे उपस्थित राहणार आहेत. दि. 22 व 23 असे दोन दिवस सुभेदार योगेंद्रसिंह सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते 22 रोजी सावंतवाडीतील विद्यार्थी व युवकांना देशसेवा व देशाभिमानाबाबत प्रेरित करणार आहेत.