For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पॅरा अॅथलीट नीरज यादवची आत्महत्या

06:20 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
पॅरा अॅथलीट नीरज यादवची आत्महत्या
Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

पॅरा अॅथलीट नीरज यादवने मंगळवारी रात्री दिल्लीतील एका फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. 42 वर्षीय नीरज ‘एफ 55’ गटात स्पर्धा करत असे. त्याने विष प्राशन केल्याचा संशय आहे. बुधवारी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन सुरू होते. पॅरालिम्पिक चॅम्पियन सुमित अंतिल आणि सहकारी पॅरा-अॅथलीट विपिन कसाना हे रुग्णालयात उपस्थित होते. नीरजच्या मृत्यूमागची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

भारताचे मुख्य पॅरा-अॅथलेटिक्स प्रशिक्षक एस. सत्यनारायण यांनी माहिती दिली आहे की, नीरजने काल रात्री आपल्या फ्लॅटमध्ये विष प्राशन केल्याचे समजले. ही अत्यंत दुर्दैवी आणि शोकांतिका आहे. प्रशिक्षकांच्या मते, ‘डोपिंग‘मुळे आलेल्या निलंबनामुळे ‘आयची-नागोया‘ आशियाई पॅरा गेम्समध्ये सहभागी होता न आल्याने नीरज मानसिक तणावाखाली असावा. मात्र, त्याच्या मृत्यूच्या नेमक्या परिस्थितीबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Advertisement

उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला नीरज यादव हा भारतातील अत्यंत यशस्वी पॅरा-अॅथलीट्सपैकी एक होता. वयाच्या सातव्या वर्षी पोलिओनंतरच्या कायमस्वरूपी अर्धांगवायूचे निदान होऊनही, त्याने आपली क्रीडाविषयक स्वप्ने जोपासली. 2005 ते 2012 या काळात त्याने व्हीलचेअर टेनिस खेळले आणि त्यानंतर तो पॅरा-अॅथलेटिक्सकडे वळला. 2015 च्या दिल्ली राज्य अॅथलेटिक्स स्पर्धेत त्यांना मोठी ओळख मिळाली, जिथे त्याने शॉट पुट, भालाफेक आणि थाळीफेक या प्रकारांत सुवर्णपदके जिंकली. 2018 मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली तिथे त्याने पुरुषांच्या टी-55 भालाफेक प्रकारात 29.84 मीटर अंतरासह आशियाई विक्रम प्रस्थापित करून सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर, 2023 च्या हांगझू आशियाई पॅरा गेम्समध्ये त्याने भालाफेक आणि थाळीफेक या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदके जिंकली, ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीतील आशियाई पॅरा गेम्समधील सुवर्णपदकांची एकूण संख्या तीनवर पोहोचली. मात्र, त्याच्या कारकिर्दीवर उत्तेजक द्रव्य सेवन (डोपिंग) प्रकरणाचे सावट आले. ऑक्टोबर 2023 मध्ये बेंगळूर येथे स्पर्धेबाहेर घेतलेल्या नमुन्यात ‘स्टॅनोझोलॉल‘ नावाचे अॅनाबॉलिक स्टिरॉइड आढळल्यामुळे, ‘नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी‘ने त्याने तात्पुरते निलंबित केले होते. त्यानंतर, त्याने उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी शिस्तपालन प्रक्रियेद्वारे आपल्या नमुन्याची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती. शारीरिक आव्हानांवर मात करून आशियाई पॅरा-अॅथलेटिक्सच्या शिखरावर पोहोचलेल्या या खेळाडूच्या आयुष्याचा शेवट अत्यंत दु:खद वळणावर झाला.

Advertisement
Tags :

.