For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पनवेलमध्ये दोघे तरूण नदीपात्रात वाहून गेले, एका तरुणाचा मृत्यू, दुसरा बेपत्ता

11:53 PM Jul 06, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
पनवेलमध्ये दोघे तरूण नदीपात्रात वाहून गेले  एका तरुणाचा मृत्यू  दुसरा बेपत्ता
Advertisement

पनवेल, प्रतिनिधी : रायगड जिह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान पनवेल तालुक्यातील धोधाणी परिसरात रविवारी (दि. 5) दुर्दैवी घटना घडली. वाघाची वाडी येथील नदीपात्रात पोहत असताना दोन तरुण पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले. यापैकी एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा अद्याप बेपत्ता आहे.

Advertisement

नयन म्हात्रे आणि सुमित यशवंत पवार अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही विचुंबे गावचे रहिवासी होते. सुमारे 10 जणांचा मित्रांचा समूह वाघाची वाडी परिसरात फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत असतानाच काही तरुण नदीत उतरले. दरम्यान, नयन आणि सुमित यांना पाण्याच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले.

घटना लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर सुमित पवार याला पाण्याबाहेर काढण्यात यश आले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, नयन म्हात्रे हा तरुण अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि बचाव पथके युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, सतत सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि नदीपात्रातील वाढलेला पाण्याचा वेग यामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. धोधाणीचे पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू असून पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.