Ratnagiri News : पनवेलमध्ये गाडी फोडून १. २० लाखांची रोकड लंपास
11:42 AM May 27, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
दापोलीतील सामाजिक कार्यकर्ते मकबूल दिनवारे यांना चोरट्यांचा दणका
Advertisement
दापोली: पनवेल परिसरात भरदिवसा गाडीची काच फोडून तब्बल १ लाख २० हजार रुपयांची रोकड चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली. दापोलीतील सामाजिक कार्यकर्ते मकबूल दिनवारे यांच्या कारला अज्ञात चोरट्याने लक्ष्य करत ही चोरी केली. विशेष म्हणजे शाळा आणि बैंक परिसरातच हा प्रकार घडल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी मकबूल दिनवारे (५२, रा. तळोजा फेज-१) यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मे रोजी मकबूल दिनवारे हे पत्नी रुबीना दिनवारे आणि मुलांसह तळोजा एमआयडीसी परिसरातील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल अँड एज्युकेशन सेंटर येथे गेले होते.
मुलीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी आपली होंडा सिटी कार शाळेसमोरील पार्किंगमध्ये उभी केली होती. दिनवारे कुटुंब शाळेत प्रवेश प्रक्रियेच्या कामात व्यस्त असतानाच अज्ञात चोरट्याने त्यांच्या हालचालीवर नजर ठेवून संधी साधली,
चोरट्याने कारच्या ड्रायव्हर सीटमागील काचेची तोडफोड करत गाडीत ठेवलेली तब्बल १ लाख २० हजार रुपयांची रोकड लंपास केली. एवढ्यावरच न थांबता चोरट्याने रुबीना दिनवारे यांच्या नावाचे आयसीआयसीआय बँकेचे सही केलेले कोरे चेकबुकही चोरून नेल्याने आणखी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध सुरू आहे.
कुटुंबाला आर्थिक फटका
ही रक्कम फ्लॅट खरेदी व्यबहारासाठी आणण्यात आल्याची माहिती समोर आली असून अचानक घडलेल्या या घटनेमुळे दिनबारे कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
ही रक्कम फ्लॅट खरेदी व्यबहारासाठी आणण्यात आल्याची माहिती समोर आली असून अचानक घडलेल्या या घटनेमुळे दिनबारे कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
पार्किंगमध्ये उभी असलेली कार लक्ष्य करून काही मिनिटांत चोरी करून चोरटा पसार झाल्याने परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मकबूल दिनवारे यांनी तातडीने खारघर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
Advertisement