पंत दिल्ली कॅपिटल्सकडून मुक्त, क्लासेनला सर्वाधिक ‘रिटेन’ किंमत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
धडाकेबाज फलंदाज व यष्टिरक्षक रिषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सने गुरुवारी मुक्त केले असून त्याला आता लिलावाला सामोरे जावे लागणार आहे तर सनरायजर्स हैदराबादचा आक्रमक फलंदाज हेन्रिच क्लासेनने आरसीबीच्या विराट कोहलीला मागे टाकत सर्वाधिक ‘रिटेनिंग’ किंमत मिळविली आहे. कोहलीला 21 कोटीला तर क्लासेनला 23 कोटीला त्यांच्या फ्रँचायजींनी आपल्या कायम राखले आहे. कोलकाता नाईट रायडर्सने कर्णधार श्रेयस अय्यरला सोडले असून गुरुवारी आयपीएल फ्रँचायजींनी आपल्या संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. कोणते खेळाडू त्या त्या संघात कायम राहणार आणि कोणत्या खेळाडूंना पुन्हा लिलावाला सामोरे जावे लागणार, याचे तर्क आता संपुष्टात आले आहेत. लिलावामध्ये आता पंत सर्वात ‘हॉट’ खेळाडू असेल. जीएमआर फ्रँचायजींनी त्याला आपल्या संघातून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंतही नाराज झाल्याचे समजते. प्रत्येक फ्रँचायजीला खेळाडू कायम ठेवण्यासाठी मेगा लिलावासाठी प्रत्येकी 120 कोटी खर्च करण्याची मर्यादा देण्यात आली आहे.