अदितीसोबत रोमान्स करताना दिसणार पंकज त्रिपाठी
पंकज त्रिपाठी आणि अदिती राव हैदरी यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘पारिवारिक मनुरंजन“चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाची कहाणी पारिवारिक आणि सामाजिक संबंधांच्या आसपास घुटमळणारी आहे. टीझर अत्यंत मजेशीर असून यात विनोदासोबत गंभीर विषयालाही स्पर्श करण्यात आला आहे.
हा चित्रपट सोनी लिव या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. सर्वसाधारणपणे गंभीर भूमिका साकारणाऱ्या पंकज त्रिपाठींची या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना खळखळून हसविणार आहे. या चित्रपटाद्वारे अदिती आणि पंकज त्रिपाठी हे पहिल्यांदाच एकत्र दिसून येणार आहेत. टीझरमध्ये हेलेन (अदिती) रंजन दुबे (पंकज त्रिपाठी)च्या घराचे दार ठोठावते. दरवाजा उघडताच हेलेन आपण दिल्लीतून आल्याचे सांगते. ‘प्रॉपर्टी मॅनेजर आणि हाउसकीपरची आवश्यकता होती ना, त्याचसाठी मी आल्याचे ती रंजन दुबे यांना सांगत असल्याचे टीझरमध्ये दिसून येते.
घरात दाखल होताच ‘इतके मोठे घर असून यात खूप काम असेल“ असे म्हणते. चौकशीत रंजन दुबे घरात एकटेच राहत असून त्यांचा विवाह झाला नसल्याचे तिला कळते. मग येथूनच हेलेन आणि रंजन दुबे यांच्यात जवळीक वाढते. तसेच हिंडणे फिरणे सुरू होते. दोघांची जवळीक कोणते वळण घेते हे चित्रपट पाहूनच कळू शकणार आहे.
