पंकज अडवाणीला रौप्यपदक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बिलियर्डस संघटनेच्या येथे खेळविण्यात आलेल्या विश्व मॅचप्ले बिलियर्डस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा अव्वल स्नुकर आणि बिलियर्डसपटू पंकज अडवाणीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. सुवर्णपदकासाठी झालेल्या अंतिम सामन्यात डेव्हिड कॉसेरने अडवाणीचा 8-7 अशा फ्रेम्समध्ये पराभव केला.
अंतिम सामना 15 फ्रेम्सचा खेळविला गेला. ब्रिटनच्या डेव्हिड कॉसेरने पंकज अडवाणीचा 19-100, 0-100, 100-47, 100-52, 19-100, 100-0, 49-100, 100-3, 34-100, 4-100, 100-85, 31-100, 100-53, 100-43, 100-28 असा पराभव केला. या अंतिम सामन्यात दोन्ही खेळाडूंनी 7-7 अशी बरोबरी साधली होती. पण निर्णायक फ्रेममध्ये डेव्हिड कॉसेरने शतकी ब्रेक नोंदवित अडवाणीचे आव्हान संपुष्टात आणत सुवर्णपदक मिळविले. अडवाणीने आयबीएसएफचे विश्व बिलियर्डस जेतेपद 2016 पासून आपल्याकडे राखले आहे. आता तो हे जेतेप स्वत:कडे पुन्हा ठेवण्यासाठी आगामी विश्व बिलियर्डस स्पर्धेत प्रयत्न करेल.