For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीत स्फोटाने घबराट : जीवितहानी टळली

06:50 AM Oct 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीत स्फोटाने घबराट    जीवितहानी टळली
Advertisement

एनआयए-एनएसजी पथक घटनास्थळी : गृह मंत्रालयाला अहवाल सादर करणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशाची राजधानी दिल्लीतील रोहिणी भागात प्रस्थान विहार येथील सीआरपीएफ शाळेबाहेर रविवारी सकाळी अचानक मोठा स्फोट झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी वा जखमी झालेले नाही. मात्र सीआरपीएफ शाळेची भिंत, जवळपासची दुकाने आणि काही गाड्यांचे नुकसान झाले आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) टीमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात क्रूड बॉम्बसदृश सामग्री सापडली आहे. मात्र, संपूर्ण अहवाल आल्यानंतरच अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे. सीआरपीएफ शाळेजवळ झालेल्या स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबतही चौकशी सुरू आहे.

Advertisement

स्फोटाच्या तपास आणि मदत कार्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. दिल्ली पोलिसांना तपासात मदत करण्यासाठी नॅशनल सिक्मयुरिटी गार्ड (एनएसजी) कमांडोही घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी करून नमुने गोळा केले असून तपास यंत्रणांकडून गृह मंत्रालयाला अहवाल सादर केला जाणार आहे.   गृह मंत्रालयाने याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडूनही अहवाल मागवला आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफ शाळेजवळ झालेल्या स्फोटाच्या कारणांबाबत अद्याप कोणतेही ठोस वक्तव्य देण्यात आलेले नाही.  रविवारी सकाळी 07:47 वाजता सीआरपीएफ शाळेजवळ मोठा स्फोट झाल्याची माहिती देणारा पीसीआर कॉल प्राप्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही, परंतु जवळपासच्या दुकानांच्या खिडक्मयांच्या काचा फुटल्या. तसेच पार्क केलेल्या वाहनांचे नुकसान झाले. ‘स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. शाळेच्या आवारात खिडकीच्या तुटलेल्या काचा व अन्य स्फोटक साहित्य सापडले. फॉरेन्सिक विभाग, गुन्हे पथक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विशेष सेलचे तज्ञ तपास करत आहेत’, अशी माहिती दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते संजय त्यागी यांनी दिली.

मुख्यमंत्री आतिशींची केंद्र सरकारवर टीका

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांनी केंद्रशासित भाजपवर टीका करत राष्ट्रीय राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्थेला जबाबदार धरले. कायदा व सुव्यवस्था राखणे ही भाजपची जबाबदारी असल्याचे त्या म्हणाल्या. राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. पण सरकार आपला 99 टक्के वेळ दिल्लीत निवडून आलेल्या सरकारचे काम थांबवण्यात घालवते, असा आरोपही आतिशी यांनी केला. आज दिल्लीतील परिस्थिती 1990 च्या दशकातील मुंबई अंडरवर्ल्डच्या जमान्यासारखी झाली आहे. शहरात खुलेआम गोळीबार सुरू आहे, गुंड पैसे उकळत आहेत आणि गुन्हेगारांचे मनोबल उंचावले आहे. भाजपकडे काम करण्याची इच्छा किंवा क्षमता नाही, असेही त्या पुढे म्हणाल्या.

लोकांमध्ये दहशत

स्फोटाचा आवाज ऐकून लोक घरातून आणि दुकानातून बाहेर आले. घटनास्थळाजवळच चष्म्याचे दुकान चालवणारा सुमित म्हणाला, ‘माझ्या दुकानाच्या खिडकीच्या काचा फुटल्या. दुकानातील सर्व सामान जमिनीवर पडले. हा स्फोट खूप मोठा होता.’ स्थानिक राकेश गुप्ता म्हणाले, ‘सकाळी 7.30 च्या सुमारास आम्हाला खूप मोठा आवाज आला. आम्हाला वाटले की जवळच एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला आहे. अनेक दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.’ असेही भयभीत लोकांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.