For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुंजी परिसरात हत्तीच्या आगमनामुळे घबराट

10:19 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुंजी परिसरात हत्तीच्या आगमनामुळे घबराट
Advertisement

नागरिक भीतीच्या छायेखाली

Advertisement

वार्ताहर /गुंजी

मंगळवारपासून गुंजी परिसरात हत्तीचे आगमन झाले असून या परिसरातील नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. या आठवड्यात खानापूर तालुक्यातील अनेक गावांत हत्तीने धुमाकूळ घातला आहे. त्याचबरोबर आता गुंजी परिसरातील संगरगाळी गावामध्ये एका टस्कर हत्तीचे दर्शन झाल्याने येथील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. सदर हत्ती मंगळवारी सायंकाळी शिंपेवाडीमार्गे गुंजी शिवारातून संगरगाळीमध्ये पोहोचला. रात्री एकच्या सुमारास या भागात रिमझिम पावसास प्रारंभ झाल्याने येथे असणाऱ्या वीटभट्टी मजूर विटा झाकण्यासाठी धावपळ करत असताना सदर हत्ती त्यांच्या दृष्टीस पडला. हत्ती दृष्टीस पडताच येथील नागरिकांची भीतीने गाळण उडाली. लागलीच त्यांनी येथील आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क केले. तसेच वनखात्याला याची माहिती दिली. सदर हत्ती पहाटे 4 वाजेपर्यंत गावाच्या सभोवताली होता. त्यामुळे काही जणांच्या केळीच्या झाडांची त्याने नासधूस केली आहे. सकाळी वन अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता सदर हत्तीचे ठसे तिवोलीवाडा गावाच्या दिशेने गेल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या या भागात वीट व्यवसायानिमित्त अनेक नागरिक शेतवडीत झोपडीत वास्तव्यास आहेत. अशा परिस्थितीमध्ये या भागात हत्तीचे आगमन झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. चार दिवसापूर्वी हा हत्ती झुंजवाड, कसबा नंदगड, नंदगड परिसरात होता. नंदगड गावच्या वेशीतही त्यांनी काहीकाळ धुडगूस घातला होता. त्यामुळे येथील लोकांत घबराट पसरली होती. वनखाते व पोलीस खात्याच्या कर्मचाऱ्यांनी या हत्तीला नंदगडच्या गावच्या पश्चिमेला असलेल्या जंगलात हुसकावून लावले होते. दोन दिवस जंगलात राहिल्यानंतर हत्तीने पुन्हा आपला मोर्चा गुंजी परिसरात वळविला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.