खराब हवामानामुळे विमान वेळेत न उतरल्याने प्रवाशांत घबराट
‘फ्लाय 91’ विमानाचे हुबळीऐवजी बेंगळूरमध्ये लँडींग
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
हैदराबादहून हुबळीला निघालेले ‘फ्लाय 91’ विमान खराब हवामानामुळे 3 तासांहून अधिक वेळ आकाशातच घिरट्या घातल्यानंतर बेंगळूरमधील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरुपपणे उतरविण्यात आले. त्यामुळे विमानातील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
रविवारी दुपारी 3 वाजता फ्लाय 91 कंपनीच्या आयसी3401 या विमानाने हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हुबळीकडे येण्यासाठी उ•ाण केले. सायंकाळी 4:30 वाजता ते हुबळीला पोहोचणार होते. मात्र, खराब हवामानामुळे विमानाला हुबळीत उतरविणे शक्य झाले नाही. त्यामुळे ते हल्ल्याळ, मुंडगोड, शिमोगा या भागात हवेतच घिरट्या घालत होते. अखेर रात्री 8 वाजता ते बेंगळूर विमानतळावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले.
या घटनेमुळे भयभीत झालेल्या विमानातील प्रवाशांनी देवाचा धावा सुरू केला. प्रवासी किंचाळत असल्याचे दृश्य असणारे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. प्रवाशांना बेंगळूरमधून हुबळीला नेण्यासाठी विमान कंपनीने कोणतीही सोय केली नाही. विमानातील तांत्रिक दोषच या समस्येला कारणीभूत आहे, असा आरोप काही प्रवाशांनी केला आहे.
विमान हुबळीजवळ आल्यानंतर खराब हवामानाची परिस्थिती निर्माण झाली. विमान नियंत्रण अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार विमान बेंगळूरमध्ये सुरक्षितपणे उतरविण्यात आले. विमानात अशी परिस्थिती निर्माण होणे सामान्य बाब आहे. विमानात कोणत्याही तांत्रिक त्रुटी आढळल्या नव्हत्या, असे फ्लाय 91 चे जनसंपर्क अधिकारी कल्पेश कुबल यांनी सांगितले.