मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् पन्हाळकरांचा वर्ल्ड हेरिटेजला विरोध
रहिवासी नागरिकांच्या बैठकीत निर्धार : पुनर्वसनला सामोरे जाण्याची धास्ती
कोल्हापूरः (पन्हाळा)
स्वराज्याची उपराजधानी असलेल्या पन्हाळा किल्ला जागतिक वारसा अर्थातच वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने पाठविला आहे. त्यानुषगांने युनेस्कोच्या पथकाने पन्हाळगडाची पाहणी देखील केली होती. त्यातच ६ मार्च रोजी पन्हाळगडावरील १३ डी या थिएटरचे व पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाच्या लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी लवकरच पन्हाळा किल्ला हा जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित होईल, असे सांगितले. असे झाले तर स्थानिकांवर अनेक निर्बंध लादले जाऊ शकतील. यामुळे ९ मार्च रोजी पन्हाळा नागरिकांची मयुरबन उद्यान येथे बैठक झाली. यामध्ये पन्हाळ्याचा जागतिक वारसास्थळात समावेशबाबत कडाडून विरोध झाला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देत लढा देण्याचा निर्धार पन्हाळावासियांनी केला.
मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेखाली महाराष्ट्रतील ११ व तामिळनाडूमधील जिंजी किल्लाचा जागतिक वारसा स्थळात समावेश करणसाठी प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये पन्हाळ्याचा समावेश आहे. पण या सर्व किल्ल्यापैकी पन्हाळा एकमेव किल्ला असा आहे, जेथे मानवी वस्ती असून वाहनेही फिरतात. तसेच येथे तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये आहेत. पण पन्हाळा जर वर्ल्ड हेरिटेजमध्ये समाविष्ट झाला तर येथून पन्हाळ्यातील नागरिकांचे पुनर्वसन होईल. गडावर नवीन बांधकाम करता येणार नाही. छोटे-मोठे स्टॉल, हॉटेल्स बंद होऊन पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोलमडला जाईल. तालुकास्तरीय शासकीय कार्यालये इतरत्र हलविण्यात येणार, पाण्याची टाकी व आकाशवाणी टॉवरची उंची कमी होणार. त्यातच पन्हाळ्यातील जुन्या जकात नाक्यावर युनेस्कोचा हातोडा पडून ही इमारत पाडण्यात आल्याने वर्ल्ड हेरिटेजबाबत पन्हाळकरांनी अधिकच धास्ती घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरच सोशल मीडियावर पन्हाळावासियांनी याला विरोध दर्शविण्यास सुरुवात केली होती. त्यातच आज सर्वांनी एकत्रित येऊन बैठकीत वर्ल्ड हेरिटेजला कडाडून विरोध केला. यावेळी छ. शिवाजी महाराज की जय...!पन्हाळा किल्ला...जागतिक वारसा स्थळात समाविष्ट होऊ देणार नाही...!युनेस्को मुर्दाबाद...!असा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, चंद्रकांत गवंडी, माजी उपनगराध्यक्ष जमीर गारदी, चैतन्य भोसले, सुनील हावळ, रवींद्र तोरसे, सतीश भोसले, अख्तर मुल्ला, जीवन पाटील, सुनील काशिद, जितेंद्र पोवार, रमेश स्वामी, विनोद गायकवाड, मंदार नायकवडी, अमित दळवी, आयाज आगा, राजु सोरटे आदी नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, पन्हाळावासियांनी वेळोवेळी याबाबत बैठक घेऊन प्रशासनाला जाग आणण्याचे काम केले. पण स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच याबाबत पावले उचलली जातील, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
बैठकीत झालेले निर्णय
कृती समिती नेमणे, वर्ल्ड हेरिटेज संदर्भात सर्व कागदपत्र मिळवणे, विविध प्रकारे आंदोलन उभे करणे, गावातील लोकांना जागृत करणे, उच्च न्यायालयात रेट पिटीशन दाखल करणे, हम्पी, बदामी या ठिकाणी भेट देऊन परिस्थिती पाहणे, इतिहास अभ्यासकरांना भेटणे तसेच स्थानिक आमदार खासदारांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणे.