For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पन्हाळगडाचा रणसंग्राम पर्यटकांच्या प्रतीक्षेत

10:53 AM Mar 10, 2025 IST | Pooja Marathe
पन्हाळगडाचा रणसंग्राम पर्यटकांच्या प्रतीक्षेत
Advertisement

उद्घाटनानंतर लघुपट तांत्रिक कारणामुळे बंदः प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आवश्यकता

Advertisement

कोल्हापूरः सुधाकर काशीद

पन्हाळगडाचा रणसंग्राम १३ डी या आधुनिक तंत्रज्ञानाने पन्हाळगडावर गेले, दोन-तीन दिवस जरूर आकर्षणाचे केंद्र ठरला. ध्वनी प्रकाश यंत्रणा, वातावरण निर्मिती ,पावसाच्या प्रसंगात साक्षात चित्रपटगृहात पाण्याचे तुषार, घोड्याची दौड होताना खुर्चीलाही जाणवणारे हलकेसे धक्के, युद्ध प्रसंगाचा स्पष्ट जाणवणारा थरार अशा तांत्रिक करामतीमुळे तो लोकांच्या मनाला जाऊन भिडला . पन्हाळगडावरील ऐतिहासिक वास्तू इतकाच हा रणसंग्रामही चर्चेचा विषय ठरला . उदघाटनही दणक्यात झाले . पण दोन दिवसात हा लघुपट दाखवणे बंद झाले आहे . तांत्रिक अडचण असे कारण सांगितले जात आहे . पण हा लघुपट रोज पर्यटकांना दाखवण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची यंत्रणा पन्हाळा नगरपालिकेकडे तातडीने उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

आपली पूर्ण तयारी नसताना एखाद्या तांत्रिक माध्यमाचे उद्घाटन केले गेले तर पुढे कोणती अडचण निर्माण होऊ शकते याचा ताजा अनुभव पन्हाळा नगरपालिका घेत आहे .त्यामुळे आता तातडीने पर्यायी यंत्रणा उभी करून हे कोटीच्या पटीत खर्च करून उदघाटन केलेले चितपटगृह सुरू व्हावे .पन्हाळगडाचा इतिहास पर्यटकांच्या समोर लघुपटाच्या माध्यमातून उभा राहवा अशीच सर्वांची इच्छा आहे. कारण उन्हाळ्याच्या सुट्टीत पन्हाळगडाचा पर्यटन हंगाम आणखी बहरणार आहे .

थ्री डी, टू डी, फाईव्ह डी अशी अत्याधुनिक थिएटर्स आपण मोठमोठ्या शहरात पाहतो . पण पन्हाळगडावर ८ आसनांची विशेष बैठक व्यवस्था असणारे हे चित्रपटगृह १३ डी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले आहे . पन्हाळा नगरपालिकेने त्यासाठी नक्कीच चांगले प्रयत्न केले आहेत.आणि त्या तंत्रज्ञानाच्या आधारे साकारलेला हा लघुपट एक वेगळाच अनुभव देणारा ठरला आहे .सहा मार्चला त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन झाले .त्यानंतर दोन दिवस लोकांनी झुंडीच्या झुंडीने येऊन हा लघुपट पाहिला . प्रत्यक्षात इतिहासही रोमहर्षक आणि त्याची मांडणीही तितक्याच ताकदीची त्यामुळे तो मोठ्या चर्चेचा आणि औत्सुक्याचाही विषय ठरला . पण हा लघुपट रोज दाखवण्यासाठी कर्मच्रायांची पर्यायी यंत्रणा आवश्यक आहे . किमान २० ते २२ जणांची त्यासाठी आवश्यकता आहे . चित्रपट व चित्रपट गृहाच्या आधुनिक तंत्रज्ञान उभारणीत असलेले अभय येतावडेकर, विजय डाकवे, शशांक पोवार ,रविराज पोवार ,व्हिडिके फॅसिलिटीजचे विक्रम गायकवाड यांनी दोन-तीन दिवस हा लघुपट पर्यटकांना दाखवला. या साऱ्या उभारणीत महत्त्वाचा वाटा असलेले आमदार विनय कोरे यांनी तर खूप प्रयत्न करत खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांना उदघाटनासाठी निमंत्रित केले. उद्घाटनाचा सोहळा मोठ्या थाटामाटात झाला. पण तीन दिवसांनी तो तांत्रिक कारण सांगून बंद ठेवला गेला आहे. येत्या दोन-तीन दिवसात या संदर्भात पन्हाळा नगरपालिका व संबंधित घटकांची बैठक होण्याची व त्यातून काही मार्ग निघण्याची शक्यता आहे .आणि तो मार्ग निघाला तरच पन्हाळगडचा रणसंग्राम हा लघुपट लोकांच्या पुढे पुन्हा पूर्ण ताकदीने येऊ शकणार आहे.

Advertisement
Tags :

.