ZP Election 2025: पन्हाळा मतदारसंघात होणार तिरंगी लढत?, तीन बड्या नेत्यांत शर्यत
जि. प. च्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने दोन नंबरची मते घेतली आहेत
By : अबिद मोकाशी
पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील पश्चिम भागातील मात्र करवीर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या कळे जिल्हा परिषद मतदारसंघात नरके, कोरे व पी. एन. पाटील या गटांमध्येच राजकीय शर्यत सुरू असते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत याठिकाणी या तिन्ही गटातच लढती पहावयास मिळत आहेत. त्यामुळे यावेळी देखील तिरंगी लढतीचीच शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या मतदारसंघाने नेहमीच आमदार चंद्रदीप नरके यांना आघाडी दिल्याने कळे मतदारसंघ म्हणजे नरके गटाचा एकप्रकारे बालेकिल्लाच. मागील जि. प. निवडणुकीत सर्वसाधारण पुरुष आरक्षण असल्याने उमेदवार निवडीपर्यंत नेत्यांना डोकेदुखी झाली. त्यातच ऐनवेळी पी. एन. पाटील अर्थात काँग्रेसकडून संदीप नरके यांनीच रिंगणात उडी घेतल्याने निवडणूक रंगतदार झाली.
परंतु याठिकाणी चंद्रदीप नरके यांनी ऐनवेळी पी. एन. पाटील गटातून आपल्या गटात उडी घेतलेल्या सर्जेराव पाटील यांना मैदानात उतरवले. साहजिकच यामुळे निष्ठावंत असलेले विलास पाटील यांनी उमेदवारी डावलल्याने आमदर नरके यांना रामराम ठोकत पी. एन. पाटील गटात समील झाले. त्यात जनसुराज्यची असलेली ताकद यामुळे याठिकाणी कोरे यांनी युवराज बेलेकर यांना संधी दिली. त्यामुळे येथे कोण बाजी मारणार हे सांगणे कठीण बनले.
अखेर याठिकाणी सर्जेराव पाटील विजयी झाले. पण असे असले तरी जनसुराज्यच्या युबराज बेलेकरांनी दोन नंबरची मते घेत चांगलीच फाईट दिली. पी. एन. पाटील गटाचे संदीप नरके तिसऱ्या क्रमांकावर गेले. कळे जि. प. मतदारसंघ विनय कोरे यांच्या शाहूवाडी-पन्हाळ्यात असता तर मात्र येथील चित्र वेगळे असते, अशी चर्चा रंगली होती.
दरम्यान, सध्या याठिकाणी पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा राहुल पाटील यांनी त्यांच्या गटाची धुरा सांभाळली आहे. त्यांनी देखील या भागात विधानसभेला चांगले मतदान घेतले. तर राज्य पातळीवर महायुतीत समाविष्ट असताना देखील संताजी घोरपडे यांना आमदार विनय कोरे यांनी उमेदवारी दिल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत देखील या तिन्ही गटातच काटाजोड लढतीची दाट शक्यता आहे.
कळे जि. प. मतदारसंघामध्ये स्थानिक पातळीवर जनसुराज्य व पी. एन. पाटील गट एकत्रित काम करतात. त्याचा प्रत्यय २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आला. यावेळी जनसुराज्यचा उमेदवार नसल्याने त्या गटाचे मतदान हे पी. एन. पाटील यांच्या पारड्यात पडले.
येथे नेहमीच जि. प. च्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने दोन नंबरची मते घेतली आहेत. त्यामुळे यावेळी पी. एन. पाटील आणि कोरे गटाची युती झाल्यास नरके गटाला धक्का बसणार की नरके आपला गड शाबूत ठेवणार, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे