For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Panhala-Pawankhind Trek Legacy: पन्हाळा-पावनखिंड मोहीम म्हणजे वर्षा सहल नको, कारण..

01:54 PM Jun 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
panhala pawankhind trek legacy  पन्हाळा पावनखिंड मोहीम म्हणजे वर्षा सहल नको  कारण
Advertisement

पन्हाळा ते पावनखिंड या मोहिमेच्या मागे खूप मोठ्या इतिहासाचा वारसा आहे.

Advertisement

By : सुधाकर काशीद

कोल्हापूर : पन्हाळगडाच्या इतिहासात सिद्धी जोहारने पन्हाळ्याला दिलेल्या वेढ्यास खूप महत्त्व आहे. तीन महिने सलग असलेल्या या वेढ्यामुळे तेवढा काळ छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यात अडकून पडले होते. म्हणजेच सलग तीन महिन्यांहून अधिक काळ छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य पन्हाळ्यावर होते.

Advertisement

एका क्षणाला त्यांनी आपल्या शूर मावळ्यांच्या बळावर हा वेढा भेदला आणि ते पन्हाळगडावरून विशाळगडाकडे वेढा भेदून गेले. एका रात्रीत मुसळधार पावसात आणि दाट जंगलातून वाट काढत मावळ्यांनी आपल्या राजाला विशाळगडावर सुरक्षित पोहोचवले.

त्यात बाजीप्रभू देशपांडे आणि असंख्य मावळ्यांनी आपले बलिदान दिले आणि इतिहासाच्या पानात या शौर्यसंग्रामाला खूप मोठे स्थान मिळाले. शिवरायांच्या इतिहासातील हा प्रसंग आजही अंगावर रोमांच उभे करतो. मावळ्यांच्या निष्ठेला दहा वेळा सलाम केला तरी तो अपुरा ठरतो.

पन्हाळा ते पावनखिंड या मार्गाबद्दल एक वेगळीच उत्कंठता निर्माण करतो. त्यामुळेच अनेक इतिहास प्रेमी गेली 40 वर्षे या मार्गावरून जात आपल्या भावना पावनखिंडीत काळजापासून व्यक्त करतात. पन्हाळा-पावनखिंड मार्ग पन्हाळा, म्हाळुंगे, मसाई पठार, कुंभारवाडी, खोतवाडी, ममंडलावाडी, अंबवडे, कळकेवाडी, पाटेवाडी, रिंगेवाडी, सुकाम्याचा धनगरवाडा ते पांढरपाणी असा आहे.

भर पावसातला हा मार्ग काहीजण एका रात्रीत पार करतात. पण बहुतांशी जणांना दीड ते दोन दिवस या मोहिमेसाठी लागतात. कारण मोहिमेतले बहुसंख्य तरुण-तरुणी नवखे असतात पाऊस, दलदल, धुके, वारे, जंगल यातून मार्ग काढताना अडखळतात, पडतात. पण मोहीम दीड दिवसांनी का होईना, निष्ठेने पूर्ण करतात.

गेल्या पंधरा-वीस वर्षांत मात्र या मोहिमेला खूप व्यापक असे स्वरूप आले. राज्यभरातून लोक या मोहिमेसाठी येऊ लागले. साधारण लहान-मोठ्या 40 संस्था पन्हाळा पावनखिंड मोहीम आयोजित करू लागल्या. त्यांच्या हेतूबद्दल अजिबात शंका नाही.

कारण पाऊस, वारा, जंगलातले मार्ग अंगावर घेत ही मोहीम आयोजित करणे आणि पूर्ण करणे हे काम नक्कीच साधे नाही.पण आता अशा वेगवेगळ्या मोहिमांतून सर्व मिळून 10 ते 12 हजार जण मोहिमेत सहभागी होतात. अर्थात तारखा वेगवेगळ्या असतात. पण तरीही दोन-तीन जणांच्या मोहिमा एकाच वेळी असल्याने रात्री मुक्काम जेवणखाणं यात अडचणी येतात, गोंधळ होतो.

अलीकडच्या काही वर्षात तर इतिहासाची जाण नसलेले काही बाहेरगावचे लोक आणि पर्यटन संस्था ही मोहीम आयोजित करतात. त्यांना आपण कोणत्या मोहिमेवर आहे, त्याचे महत्त्व आणि गांभीर्य काय आहे, हे पूर्ण माहीत नसते. त्यामुळे ते पर्यटनाला आल्याप्रमाणे पैसे भरून घेतात आणि या मोहिमेवर लोकांना आणतात. लोकही पैसे भरले म्हणजे सर्व सुविधा असणार, अशा समजुतीत येतात.

अडचणीत मुक्काम करण्यास ते कुरकुर करतात, जेवणावर नाखुश असतात. पाऊस, धुके, जंगल, वारे, दलदलीच्या एवढ्या अडथळ्याच्या मार्गावरून जायचे आहे, हे आम्हाला आधी सांगितले नव्हते, अशी तक्रार करतात. रडतखडत कशी तरी मोहीम पूर्ण करतात, अशा मोहिमांमुळे खूप विसंगती दिसून येते आणि त्याचे प्रमाण अलीकडे वाढते आहे.

या मोहिमेला इव्हेंटचे स्वरूप ही काहीजण आणत आहेत. अर्थात अतिशय जाणिवेने पन्हाळा पावनखिंड मोहीम आयोजित करणाऱ्या पारंपरिक संस्थांची भावना इतिहासाचा सन्मान राखणारीच आहे. त्यामुळे या मोहिमा व्यवस्थित तरी होत आहेत. पण भविष्यात अशा इव्हेंटसारख्या धर्तीवर पन्हाळा पावनखिंड मोहीम करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज आहे. ही मोहीम म्हणजे वर्षा सहल नाही, हे प्रत्येकाला ठणकावून सांगण्याची गरज आहे.

मोहिमेचे पावित्र्य सर्वजण जपणार

या परिस्थितीचा अंदाज आल्याने पन्हाळा पावनखिंड मध्यवर्ती समन्वय समितीने एक आचारसंहिता तयार केली आहे. एकमेकात समन्वय राखणे, आपापल्या सोबत आलेल्या लोकांना ते ओळखण्यासाठी एका विशिष्ट रंगाचे टी-शर्ट किंवा टोपी देणे. मोहिमेत चुकूनही दंगाधोपा न करणे. मोहिमेचे पावित्र्य सर्व पातळ्यावर जपणे अशा सूचना समन्वय समितीचे डॉ. अमर अडके, हेमंत साळोखे, सागर पाटील, पंडित पवार यांनी केले आहे.

पन्हाळा ते पावनखिंड या मोहिमेच्या मागे खूप मोठ्या इतिहासाचा वारसा आहे. किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील आणि युद्धशास्त्रातील एक शौर्यशाली प्रसंगाचा तो ठेवा आहे. या इतिहासाचे स्मरण आणि पन्हाळा पावनखिंड या ऐतिहासिक मार्गाला आपलेही पाऊल लावायची, ती एक संधी आहे.

अतिशय जाणिवेने दरवर्षी 12 जुलै ते 20 जुलै या काळात त्या मार्गावरून जात या मोहिमेचे स्मरण तरुणांकडून केले जात आहे. पण अलीकडच्या काळात काहीजण पावसातील भ्रमंती किंवा वर्षा पर्यटन अशा अर्थाने यात सहभागी होऊन त्याला इव्हेंटचे स्वरूप देत आहेत आणि हे चित्र रूढ होण्याआधीच बदलण्याची नितांत गरज आहे.

इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची खबरदारी

आठशे ते हजार जणांना या मोहिमेसाठी तीन ते चार टप्प्यातून नेतो. मोहिमेचे महत्त्व तसुभरही कमी होणार नाही, याची दक्षता घेतो. काही हवसेनवसे असतात. त्यांना जागीच समजावतो. मोहिमेतून शिवरायांचा इतिहास आणखी जागा करतो तो नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, याची खबरदारी घेतो.

- प्रमोद पाटील, हिल रायडर्स व हायकर्स

Advertisement
Tags :

.