Succesa Story: सायकल ते आलिशान चारचाकी गाडी, वृत्तपत्र विक्रेत्याचा जिद्दी प्रवास...
अंक कमी आहेत म्हणून एकही दिवस कधी खाडा केला नाही
कोल्हापूर : रोज पहाटे तीनला उठायचं, सायकल बाहेर काढायची आणि कोल्हापुरात जाऊन विविध वृत्तपत्रे घ्यायची. चिखली, आंबेवाडी, वरणगे, पाडळी येथील वाचकांच्या घरात सकाळी सातच्या आत ती वृत्तपत्रे पोहोच करायची. सुरुवातीला फक्त 16 अंक होते. पण अंक कमी आहेत म्हणून एकही दिवस कधी खाडा केला नाही.
कधी सुट्टी घेतली नाही. कंटाळा तर कधी केलाच नाही. आज 650 अंक आहेत आणि केवळ त्याच्या बळावर खूप चांगली वाटचाल सुरू आहे. सायकलपासून सुरू झालेला प्रवास आज स्वत:च्या चारचाकीपर्यंत येऊन पोहोचला आहे. वरणगे, पाडळी येथील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते पांडुरंग पाटील (वय 53) आपली वाटचाल ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना उलगडत जात होते.
स्वत:ला वृत्तपत्र विक्रेता म्हणून घेण्याचा पांडुरंग पाटील यांना आजही खूप अभिमान आहे. ते म्हणाले, आमच्या कुटुंबाची अगदी साधी परिस्थिती. त्यामुळे दुसऱ्याच्या शेतात काम करण्यापासून ते ऊस तोडणीला जाईपर्यंतची सर्व कामे करावी लागली. आईबरोबर या कामावर मी हजेरी लावली. 1992 साली वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
या व्यवसायातील खरी कसोटी म्हणजे रोज पहाटे तीनला उठावेच लागते. त्यानंतर पाऊस, थंडी असे न म्हणता वाचकांच्या दारात अंक टाकायला जावेच लागते. कधी बिल घ्यायला गेल्यावरच त्या घरातल्या लोकांना आपल्या घरात एवढ्या सकाळी जो पेपर टाकतो त्याचा चेहरा बघायला मिळतो.
या क्षेत्रातले वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळे अनुभव उलगडताना ते म्हणाले, हळूहळू 16 वृत्तपत्रावरून मी 650 वृत्तपत्र अंकांपर्यंत गेलो. एका टप्प्यात मी सायकलीला आराम दिला. रिक्षातून अंक आणायला कोल्हापुरात जायला लागलो. या साऱ्या वाटचालीत अगदी ठरवून म्हणजे ठरवून एकाही दिवशी कंटाळा केला नाही.
अंक टाकून झाल्यावर पानाची टपरी चालवू लागलो. त्यावेळी मित्रांचा त्यासाठी मोठा हातभार लागला. दुपारच्या वेळेत रिक्षा व्यवसायही सुरु केला. पानटपरीचे रूपांतर बेकरीत केले. त्यामुळे आणखी व्याप मागे लागला. पण कशाचाही कंटाळा करायचा नाही, हा स्वत:शीच केलेला वादा माझ्याकडून पाळला गेला.
या साऱ्या वाटचालीत पत्नी रंजना, मुली पल्लवी, प्रियांका आणि मुलगा यश यांचा नक्कीच आधार राहिला. दोन्ही मुली ग्रॅज्युएट झाल्या, त्यांची लग्ने झाली. मुलगा कॉलेजला आहे. त्याला तयार कपड्याचे दुकान घालून दिले आहे. आता एकाच्या दोन रिक्षा झाल्या आहेत.
दोन स्कूल बस आहेत. व्याप नक्कीच वाढला आहे. पण पहाटे तीनला उठायचे, वृत्तपत्र घ्यायला कोल्हापुरात जायचे आणि स्वत: वाचकांच्या घरापर्यंत अंक वाटायचे, हे आजही अखंडपणे सुरू आहे. कारण मी स्थिरस्थावर होण्याचा पाया वृत्तपत्र विक्री हाच आहे. त्यामुळे तो पाया मी हलू दिलेला नाही.
वेळापत्रक ठरवून काम वृत्तपत्र, बेकरी, रिक्षा, स्कूलबस हे सारे पाहताना 15 तास झटावे लागते. पण मी कधी कंटाळा केला नाही. आजचे काम उद्यावर टाकले नाही. रात्री मी नऊ वाजता झोपणार म्हणजे झोपणार आणि पहाटे तीनच्या ठोक्याला उठणार म्हणजे उठणार, हे आजही ठरले आहे. जीवन कितीही घाई गडबडीचे असले तरी त्याचे एक वेळापत्रक ठरवून मी काम करत आहे.
पहाटे उठणे म्हणजे एक तापच आहे. हे मी कधीही म्हणत नाही. कारण रोज पहाटे उठल्यामुळेच आज तब्येत ठणठणीत आहे. अर्थात माझे कुटुंब त्यामुळेच समाधानी आहे.
बातमीच्या व्हिडिओसाठी -