For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंडित कडलास्कर बुवा संगीत संमेलन संस्मरणीय

10:18 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंडित कडलास्कर बुवा संगीत संमेलन संस्मरणीय
Advertisement

बेळगाव : पं. बी. व्ही. कडलास्करबुवा स्मृती संगीत संमेलन नुकतेच शहापूर सरस्वती वाचनालयात पार पडले. यात प्रस्थापित आणि नवोदितांनी आपली कला सादर केली. कन्नड आणि संस्कृती खात्याचे संयुक्त संचालक के. एच. चेन्नूर यांनी दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन केले. व्यासपीठावर संतोष नाहर, पं. रघुनाथ नाकोड, ट्रस्टचे अध्यक्ष पं. गुरुराज कुलकर्णी उपस्थित होते. प्रारंभी जयश्री सवागुंजी यांनी राग मुल्तानी आळवला. पं. संतोष नाहर यांच्या व्हायोलिन वादनाला श्रोत्यांनी टाळ्यांनी दाद दिली. त्यांनी राग किरवाणी उत्कृष्टपणे पेश केला. नंतर पिलू व ठुमरी वाजवून त्यांनी दोन तास रसिकांना खिळवून ठेवले. त्यांना पं. रघुनाथ नाकोड आणि रविकिरण नाकोड यांनी तबला साथ करून रंगत आणली. रेणुका नाकोड यांनी रागेश्री रागातून विलंबित एकतालात छोटा ख्याल सादर केला. नंतर ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग सादर केला. श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद देत ‘भाग्यद लक्ष्मी बारम्मा’ हे गीत सादर करण्याची फर्माईश केली. त्यानंतर मुंबईचे महेश कुलकर्णी यांनी राग चंद्रकंस अत्यंत प्रभावीपणे गायिला. ‘काया का पिंजरा बोली रे...’ हे पद सादर करून आपले गायन संपविले. या कलाकारांना संवादिनीची साथ पं. सुधांशू कुलकर्णी, सारंग कुलकर्णी यांनी तर अंगद देसाई, कृष्णा येरी यांनी उत्तमपणे तबला साथ केली. यशवंत बोंद्रे यांनी पखवाजची साथ केली.

Advertisement

पं. कडलास्कर बुवांच्या पादुकांचे पूजन करून हरिकाका भजनी मंडळाने दोन भजने सादर केली. विजय बांदिवडेकर यांनी राग ललत पेश केला. नंतर उषा रानडे यांनी राग जीवनपुरी सादर केल्यानंतर दोन भजने म्हटली. गीतांजली भजनी मंडळाने आपली गानसेवा रुजू केली. मंजुश्री खोत यांनी सुगम संगीत सादर केले. अनिता पागद यांनीही गानसेवा केली. पद्मजा बापट यांच्या भजनी मंडळाने दोन भक्तिगीते सादर केली. यावेळी मुतालिक-देसाई यांनीही गायन प्रस्तुत केले. सीमा कुलकर्णी यांनी दोन मराठी व हिंदी भजन म्हटले. रुद्रम्मा याळगी यांनी दोन जानपद गीते गाऊन रामाचे भजन सादर केले. प्रतिभा आपटे यांच्या भजनी मंडळाचे भजन झाले. नंतर पं. राजप्रभू धोत्रे, गुरुराज कुलकर्णी, महेश कुलकर्णी, बांदिवडेकर यांनी सामूहिकपणे भैरवी म्हटली. या कलाकारांना सुरेश सरदेसाई, महेश कुलकर्णी, निरंजन मूर्ती यांनी संवादिनीची तर तबल्याची साथसंगत महाबळेश्वर साबण्णावर, जितेंद्र साबण्णावर, बाबुराव कानविंदे, गजानन कुलकर्णी, सतीश गच्ची यांनी केली. अभिजीत अष्टेकर व स्मिता मिटगार यांनी सूत्रसंचालन केले. गुरुराज कुलकर्णी यांनी आभार मानले.

Advertisement
Advertisement
Tags :

.