एस. के. पाटील महाविद्यालयात रोजगार मेळावा उत्साहात
मालवण : स्थानिक एस. के. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन व नियुक्ती कक्षाच्या वतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ उत्साहात पार पडला. विविध आस्थापनांमधील सुमारे १२५ रिक्त पदांसाठी या मेळाव्यात उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
या रोजगार मेळाव्यात ‘ग्रो बिग’, ‘श्री विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘रोनक एंटरप्रायजेस’ या तीन आस्थापनांनी सहभाग घेतला. संबंधित आस्थापनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेत त्यांना रोजगाराच्या संधी तसेच आवश्यक कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले.
श्री विनायक व्हील्सच्या वतीने मयूर पाताडे, रोनक एंटरप्रायजेसच्या वतीने माधव काजरेकर आणि ग्रो बिगच्या वतीने विनायक जाधव यांनी मुलाखती घेतल्या.
मेळाव्यात महाविद्यालयातील एकूण २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पात्रता आणि मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे त्यापैकी चार विद्यार्थ्यांची प्राथमिक स्तरावर निवड करण्यात आली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, डॉ. सुमेधा नाईक, डॉ. उज्वला सामंत, डॉ. बेळेकर, सावंत मॅडम तसेच करिअर मार्गदर्शन व नियुक्ती कक्षाचे समन्वयक संग्रामसिंह पवार उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने उपस्थितांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच रोजगाराच्या क्षेत्रातील आवश्यक मार्गदर्शन आणि संधी मिळाव्यात, या उद्देशाने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.