पंडित अजित कडकडे यांना ‘गोमंत विभूषण’ जाहीर
पणजी : राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान अशी ख्याती असलेला ‘गोमंत विभूषण’ पुरस्कार यंदा नामवंत शास्त्राrय गायक पंडित अजित कडकडे यांना जाहीर झाला आहे. काल शुक्रवारी घटकराज्य दिन सोहळ्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्या पुरस्काराची घोषणा केली. गोमंतकीय सुपूत्र पं. कडकडे यांनी आपली सुमधुर गायकी, भक्तिरसपूर्ण अभंग व भजन याद्वारे गोवा तसेच राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. पंडितजी सध्या मुंबईत स्थायिक असले तरी, आपण गोमंतकीय असल्याचे ते अभिमानाने सांगतात, याचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. अशा या महान कलाकाराच्या योगदानाचा गौरव म्हणून त्यांना गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लवकरच एका औपचारिक समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
गोवा सरकारचे आभार मानतो : कडकडे
‘गोमंत भूषण’ पुरस्कारामुळे आपल्याला फार आनंद झाला. आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे व्यक्तिश: आभार मानतो, अशा शब्दात प्रख्यात गायक पंडित अजित कडकडे यांनी आपल्या भावना दैनिक ‘तरुण भारतशी’ व्यक्त केल्या. आपण मूळ गोमंतकीय आहे, गोंयकार आहे आणि आपण गोव्यामध्ये जिथे जिथे संगीताचा कार्यक्रम करतो त्यावेळी आपण एक तरी कोकणी गीत जातोच. आपल्याला कोंकणी भाषेबद्दल फार अभिमान आहे. गोवा माझी जन्मभूमी आहे आणि महाराष्ट्र कर्मभूमी आहे. आपण एवढ्या वर्षात संगीतक्षेत्रात जी सेवा केली त्याची गोवा सरकारने दखल घेऊन आपल्याला हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला. आपण गोंयकार आहे, हे सरकारने मान्य करून या पुरस्काराद्वारे आपल्याला खूप मोठी मान्यता दिल्याबद्दलही आपण कृतज्ञ आहे, अशा शब्दांत पं. अजित कडकडे यांनी गोवा सरकारचे आभार मानले.