सुवर्ण अलंकारांनी खुलले विठ्ठल-रुक्मिणी मातेचे रूप; पंढरपुरात भाविकांची मांदियाळी
पंढरपूर (प्रतिनिधी : संतोष रणदिवे) : श्री गौरी आगमनानिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल, रुक्मिणी माता आणि महालक्ष्मी मातेस आकर्षक व पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. अलंकारांनी नटलेल्या तिन्ही देवतांचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपट्ट्यांची जोडी, हिऱ्यांच्या कंगनांची जोडी, मोत्याचा तुरा, मोत्याच्या एक व दोन पदरी कंठ्या, मोत्यांचा हार, शिरपेच, मत्स्य जोडी, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, अष्टपैलू मण्याची तीन पदरी कंठी, तोडे, तुळशीची एक पदरी माळ आणि बोरमाळ आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.
रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्यांची जोडी, तोडे, तानवड, चिंचपेटी, जवमणी पथक, जवेच्या माळा, लक्ष्मी हार, मोरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी आणि कंबरपट्टा आदी सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले.
महालक्ष्मी मातेस सोन्याचे गंठण, सात पदरी तांदळ्यांचा हार, एक व दोन पदरी मोत्यांच्या कंठ्या, लक्ष्मी लॉकेट पदकासह, जवेची माळ आदी सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले आहेत.
पारंपरिक सुवर्ण अलंकारांमुळे श्री विठ्ठल, रुक्मिणी माता आणि महालक्ष्मी मातेचे रूप अधिकच मनोहारी व भक्तिमय दिसत आहे. हे अलंकार पाहण्यासाठी भाविकांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले असून, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.