श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन तीन दिवस बंद; 23 ते 25 सप्टेंबरदरम्यान मूर्ती संवर्धनाचे काम होणार
संतोष रणदिवे
पंढरपूर : वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मूर्तींच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर 23 ते 25 सप्टेंबरदरम्यान तीन दिवस मंदिरातील दर्शन व्यवस्था बंद राहणार आहे. संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यानंतर 26 सप्टेंबरपासून भाविकांना पूर्ववत दर्शन घेता येणार आहे.
श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींचे संवर्धन अत्यंत काळजीपूर्वक करण्यात येणार असून, या कामासाठी पुरातत्त्व विभागातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर तसेच राज्य पुरातत्त्व विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे.
मूर्तींच्या नियमित देखभालीचा भाग म्हणून त्यांना संरक्षक आवरण (Protective Coating) देण्यात येणार आहे. यामुळे मूर्तींचे संरक्षण होण्यास मदत होणार असून, त्यांच्या जतनाच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
यापूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींचे 1988, 2005, 2012 आणि 2020 या कालावधीत संवर्धन करण्यात आले होते. मागील संवर्धनास सुमारे पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने नियमित देखभालीच्या अनुषंगाने हे काम करण्यात येत आहे.
संवर्धनाच्या कामादरम्यान भाविकांच्या गर्दीमुळे कामात अडथळा निर्माण होऊ नये आणि मूर्तींच्या संवर्धनाची प्रक्रिया सुरक्षितपणे पूर्ण करता यावी, यासाठी तीन दिवस दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत दर्शन बंद राहणार असल्याने वारकरी, भाविक आणि नागरिकांनी याची नोंद घ्यावी, तसेच संवर्धनाच्या कामासाठी मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी केले आहे.
26 सप्टेंबरपासून मंदिरातील दर्शन व्यवस्था नियमितपणे सुरू होणार असल्याने भाविकांनी त्यानुसार पंढरपूर यात्रेचे नियोजन करावे, असेही मंदिर समितीने स्पष्ट केले आहे.