For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | अधिक महिन्याच्या गर्दीत रिक्षाचालकांची गुंडागर्दी

01:57 PM Jun 08, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
solapur news   अधिक महिन्याच्या गर्दीत रिक्षाचालकांची गुंडागर्दी
Advertisement
रिक्षाचालक जादा पैसे आकारुन आणि मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी भरून धोकादायक वाहतूक करत आहेत
पंढरपूर : भारताची दक्षिण काशी पंढरपूर येथे सध्या पुरुषोत्तम मास म्हणजेच धोंडा महिन्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होत आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन गावातील रिक्षाचालक जादा पैसे आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून धोकादायक वाहतूक करत आहेत. शहरातील चौफाळा या भागात मोठी गर्दी असूनही हे मुजोर रिक्षावाले रिक्षा उभ्या करून रहदारीस अडथळा निर्माण करत आहेत.
या भागातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि दुकानापुढे बिनधास्त गाड्या उभ्या करून दादागिरी करीत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. वाहतूक पोलीस केवळ दिखाव्यापुरती कारवाई करीत असून अनेक रिक्षावाले उद्धट वर्तन करत असल्याचे दिसून येत आहे. गॅस, पेट्रोल महाग झाले आहे असे सांगून दुप्पट भाडे घेतले जाते.
यातील अनेक रिक्षा या भंगारला घालण्याच्या लायकीच्या व नादुरुस्त असून अनेक गाड्यांना परमिट नाही. काही रिक्षांवर नंबरसुद्धा नसतात. वाहतूक पोलिसांनी फोटो काढून दंड आकारला तर तो मूळ मालकाला लागतो. आपण काहीही केले तरी ही काहीच होऊ शकत नाही असा फाजील विश्वास त्यांना आला असल्याने मुजोरी कायम आहे.
अनेकदा हे रिक्षावाले ग्राहकांवरून आपसात भांडत असतात. भाडे घेण्यावरून घाणेरडी भाषा, अश्लील शिवीगाळ, अनेकदा किरकोळ स्वरूपाच्या मारामारी, गलिच्छ वर्तन, तंबाखू, गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणे असे गैरप्रकार स्थानिक नागरिक उघड्या डोळ्यांनी पाहत असून दररोज अन्याय सहन करावा लागत आहे.
Advertisement

रात्री उशिरा परिसरातील दुकाने बंद झाली की दोन दोन रांगांमध्ये रिक्षा उभ्या करून रहदारीस अडथळा निर्माण करीत असतात. यामुळे रात्री उशिरा गावात येणाऱ्या चारचाकी वाहनास मोठा अडथळा होत आहे.
 
 

Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.