Ashadhi Ekadashi |आषाढी वारीसाठी पंढरपूर सज्ज! लाखो वारकऱ्यांसाठी प्रशासनाची मॉकड्रिल
सोलापुर - आषाढी एकादशी महासोहळा 2026 यात्रेनिमित्त लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. यात्रेदरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ आणि प्रभावी प्रतिसाद देता यावा, यासाठी प्रशासनाकडून रेल्वे स्टेशन तसेच संत तुकाराम महाराज भवन येथे मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले.
या सरावाद्वारे विविध विभागांमधील समन्वय आणि आपत्कालीन व्यवस्थेची सज्जता तपासण्यात आली.आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने शहर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि इतर संबंधित यंत्रणांच्या सहभागातून संत तुकाराम महाराज भवन येथे मॉकड्रिल पार पडली.
या सरावामध्ये गर्दी नियंत्रण, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, जखमींना तातडीने वैद्यकीय मदत, अग्नितांडव किंवा इतर दुर्घटना घडल्यास बचावकार्य कसे करायचे याचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला. विविध विभागांमधील समन्वय, संवाद व्यवस्था आणि प्रतिसादाचा कालावधीही यावेळी तपासण्यात आला.
यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि वेगाने कार्य करावे, हा या मॉकड्रिलचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.
आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या असून, रेल्वे स्टेशन तसेच संत तुकाराम महाराज भवन येथे झालेल्या या मॉकड्रिलमुळे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची तयारी अधिक बळकट झाल्याचे दिसून आले.
यावेळी पंढरपूर शहर पोलिस निरीक्षक मुजावर, पोलिस उपनिरीक्षक युवराज पाटील, उपनिरीक्षक पंकज गाडेकर आदी अधिकारी उपस्थित होते.