For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pandharpur | आषाढी यात्रेसाठी मंदिर समिती सज्ज! 16 जुलैपासून 24 तास विठ्ठल दर्शन

05:28 PM Jul 14, 2026 IST | NEETA POTDAR
pandharpur   आषाढी यात्रेसाठी मंदिर समिती सज्ज  16 जुलैपासून 24 तास विठ्ठल दर्शन
Advertisement

 सोलापूर -आषाढी एकादशी यात्रेसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने व्यापक नियोजन पूर्णत्वास नेले असून, यंदा १५ ते २९ जुलै या यात्रा कालावधीत १८ ते २० लाख भाविक पंढरपुरात दाखल होण्याचा अंदाज आहे. भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत दर्शन मिळावे यासाठी दर्शनरांग, सुरक्षा, आरोग्य, निवास, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि आपत्कालीन सेवांसह सर्व सुविधांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. १६ जुलैपासून ३ ऑगस्टपर्यंत श्री विठ्ठलाचे २४ तास दर्शन सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

Advertisement

आषाढी शुद्ध एकादशी अर्थात २५ जुलै रोजी पहाटे २.२० वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. त्याचबरोबर पाद्यपूजा, नित्यपूजा, संतांच्या भेटी, श्रींच्या पादुकांची मिरवणूक, महाद्वारकाला आणि प्रक्षाळपूजेसह सर्व धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

यंदा दर्शनरांग व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यात आले आहे. श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपापासून गोपाळपूरपर्यंत सुमारे सहा किलोमीटरची पदस्पर्श दर्शनरांग उभारण्यात येणार असून, स्कायवॉक, बॅरिकेडिंग, ताडपत्री शेड, अतिरिक्त पत्राशेड आणि आठ तात्पुरते उड्डाणपूल उभारले जात आहेत. मुखदर्शनासाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

Advertisement

दर्शनरांगेत भाविकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, चहा, खिचडी वाटप, कुलर, लाईव्ह दर्शन, विश्रांती कक्ष, हिरकणी कक्ष, अन्नछत्र, स्वच्छतागृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, अतिदक्षता विभाग, चौकशी कक्ष, हरवले-सापडले विभाग, सार्वजनिक सूचना प्रणाली, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन वाहने आणि रुग्णवाहिका अशा सर्व सुविधा उपलब्ध राहणार आहेत.

मंदिरात मोबाईल आणि कॅमेऱ्यांना बंदी असल्याने भाविकांसाठी पाच ते सहा ठिकाणी मोबाईल लॉकर उभारण्यात येणार आहेत. मंदिर, दर्शन मंडप आणि भक्तनिवास येथे आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार असून, बुंदी व राजगिरा लाडूचा प्रसाद अल्प दरात उपलब्ध करून दिला जाणार आहे.

यात्रेदरम्यान कायम कर्मचारी, हंगामी कर्मचारी, स्वयंसेवक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मिळून सुमारे २,५०० मनुष्यबळ भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहे. पदस्पर्श दर्शन २२ तास १५ मिनिटे, तर मुखदर्शन २४ तास सुरू राहणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने १५० सीसीटीव्ही कॅमेरे, बॅग स्कॅनर, मेटल डिटेक्टर, मॅन काउंटिंग मशीन, ४० वॉकी-टॉकी संच, जनरेटर, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आणि सार्वजनिक सूचना प्रणाली कार्यरत राहणार आहे. चंद्रभागा नदीपात्रात एसडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापन पथक, स्थानिक पोहणारे आणि मंदिर कर्मचारी मिळून सुमारे २५० जणांचे पथक तैनात राहणार आहे. महिला भाविकांसाठी २५ चेंजिंग रूम आणि सहा हिरकणी कक्ष उपलब्ध करण्यात आले आहेत.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच मंदिर समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक आणि विविध शासकीय यंत्रणा यांच्या समन्वयातून यंदाची आषाढी यात्रा सुरक्षित, सुव्यवस्थित आणि भाविकाभिमुख करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.