Pandharpur Nandwal 2025: ज्ञानेश्वर, माऊली, तुकारामाचा जयघोष, प्रतिपंढरपुरात आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न
भाविक रात्री बारा वाजलेपासून या ठिकाणी दर्शनासाठी येण्यास सुरुवात करतात
By : एम. डी. पाटील
वाशी :
सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला
तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला ॥ १ ॥
आषाढी एकादशीला साधुसंत होती गोळा
साधुसंत होती गोळा तुझ्या दर्शनाला ॥ 2 ॥
दहीभात याचा काला हाका मारीतो न त्याला
चला चला देवराया भोजनाला ॥ ३ ॥
जनाबाई माझा विठ्ठल सावळा
वेडे केले त्याने साऱ्या जगाला ॥ ४ ॥
या अभंगाच्या उक्तीप्रमाणे जगाला वेड लावणाऱ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रति पंढरपूर नंदवाळ येथील आषाढी यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने सुमारे तीन ते चार लाख भाविकांनी आज विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. आज पहाटे विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा करवीरचे आमदार चंद्रदीप नरके, करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे आणि पहिला वारकरी गोपाळ गणपती हतकर त्यांची पत्नी आनंदी हतकर (रा .तुरंबे) या दाम्पत्यांच्या हस्ते पूजा व अभिषेक करण्यात आला.
यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष विश्वास फाटक, व्यवस्थापक भीमराव पाटील, सरपंच अमर कुंभार उपस्थित होते. आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल रुक्मिणीचे वास्तव्य नंदवाळ येथे पहाटे चारपर्यंत असते, अशी भावना भाविकांमध्ये आहे. त्यामुळे या परिसरामधील वाशी, कांडगाव, हळदी, कोथळी, देवाळे, सडोली-खालसा, बाचणी, आरे या ठिकाणाहून भाविक रात्री बारा वाजलेपासून या ठिकाणी येण्यास सुरुवात करतात.
शनिवारी दुपारपासून वारकरी दिंड्या या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली होती. आज कोल्हापूर कर्नाटकसह आसपासच्या गावांमधून चांदे, येळवडे, आरे, देवाळे, हळदी, कोथळी, परिते, सडोली-खालसा, बाचणी अशा सुमारे 60 ते 70 दिंड्या या ठिकाणी आल्या आहेत. यावेळी कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमोल महाडिक यांनी नांदवळ येथे भेट देत दर्शन घेतले. तसेच विविध पक्षांच्यावतीने आणि विविध संस्था, मंडळे, शाळा यांच्याकडून ठीकठिकाणी उपसासाठी प्रसाद वाटप करण्यात येत होते.