शियेतील विलास पाटील यांची व्हीलचेयर वरून १७ किलोमीटर वारी
शिये वार्ताहर
शिये ( ता. करवीर ) येथील द कोल्हापूर क्रशर ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष विलास आबू पाटील यांनी शिये ते पंढरपूर पायी दिंडी वारीत व्हील चेअर वरून सुमारे १७ किलोमीटर अंतराचा टप्पा उस्फूर्तपणे भक्ती पूर्ण वातावरणात पार केला.
विलास पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शिये आणि परिसरातील विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात नेहमीच उत्स्फूर्त सहभाग असतो. त्यांचा मुलगा विश्वनाथ (हामू ) व सून प्रीती यांचा शिये येथून शिये ते पंढरपूर पायी दिंडी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी निघणाऱ्या पायी दिंडी सोहळ्यात प्रत्यक्ष सहभाग असतो. तर कुटुंबीयांच्या वतीने वारकऱ्यांच्या एका मुक्कामाच्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली असते. विलास पाटील यांना सहा वर्षापूर्वी अचानक वायरल इन्फेक्शन झाल्याने त्यांच्या दोन्ही पायातील संवेदना कमी झाल्या आणि त्यांना व्हील चेअर चा आधार घ्यावा लागला. तरीही त्यांनी आत्मविश्वास व जिद्द न हरता आपल्या संसाराचा व व्यवसायाचा गाडा अविरतपणे चालू ठेवला. त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमात नेहमीच हिरीरीने सहभाग घेण्याचा त्यांचा पिंड असल्याने त्यांना वारीची आस नेहमीच लागून राहिली . त्यामुळे त्यांनी आजारपणामुळे पाय साथ देत नसले तरी व्हीलचेअर वरून वारीचा थोडा टप्पा पार करण्याची ठरविले आणि त्यांनी इलेक्ट्रिक व्हीलचेअर वरून बोरगाव ते शेळकेवाडी हा सुमारे १७ किलोमीटरचा टप्पा पार केला. यावेळी त्यांच्याबरोबर तीनशे वारकरी सहभागी झाले होते.
वारीत पायी चालल्याचा भास
पायी वारीत व्हीलचेअर वरून सहभागी झालो असलो तरी मला प्रत्यक्ष पांडुरंगाच्या पायी वारीत गावातील वारकऱ्यांबरोबर पायी चालत असल्याचा भास झाला असल्याचे विलास पाटील यांनी तरुण भारत शी बोलतना सांगितले.