For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंढरीची वारी : भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक एकतेचा संगम

06:38 AM Jul 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंढरीची वारी   भक्ती  श्रद्धा आणि सांस्कृतिक एकतेचा संगम
Advertisement

आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी! वर्षभरातील 24 एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. या वर्षी आषाढी एकादशी 25 जुलै 2026 ला आहे. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती.

Advertisement

आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. “पाऊले चालती पंढरीची वाट” या गाण्याच्या ओळी शाश्वत वाटतात. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राला लाभलेली अनोखी भक्तीपरंपरा आहे. आळंदी आणि देहू या ठिकाणाहून निघणारी माऊलींची दिंडी अनुभवणं म्हणजे सुख अनुभवणं आहे. “ज्ञानोबा-तुकाराम” या अखंड जयघोषाने दुमदुमणारे महाराष्ट्र, टाळ-मृदुंगाच्या निनादात, हरिनामाच्या गजरात आणि लाखो वारकऱ्यांच्या भक्तिमय पावलांनी सजणारी आषाढी वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक परंपरेचे जिवंत प्रतीक आहे. शेकडो वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा भक्ती, समता, शिस्त, सेवा आणि मानवतेचा संदेश देत आली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पायी चालत येतात. या प्रवासात केवळ देवदर्शन नसते, तर आत्मशुद्धी, समाजप्रबोधन आणि सामूहिक जीवनमूल्यांचा अनोखा अनुभव असतो. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही वारीचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट दरवर्षी लाखो भाविक या सोहळ्यात सहभागी होतात. वारीमध्ये कोणालाही मोठे किंवा लहान मानले जात नाही. सर्वजण “माऊली” या संबोधनाने एकमेकांना हाक मारतात. हा शब्द प्रेम, आदर आणि समानतेचे प्रतीक आहे. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा आत्मा आहे. आषाढी वारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे तिची अद्भुत शिस्त. लाखो लोक सहभागी असूनही संपूर्ण वारी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडते. पंढरीची वाट चालताना वारकरी केवळ पंढरपूर गाठत नाही, तर स्वत:च्या अंत:करणातील विठ्ठलाला भेटण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच वारी ही केवळ पायी चालण्याची यात्रा नसून आत्मशुद्धी, भक्ती आणि मानवतेचा अविस्मरणीय उत्सव आहे.

आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी किंवा पंढरपूर एकादशी असेही म्हणतात, ही हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील अकराव्या दिवशी येते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. पंढरपूरचा विठुराया हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. आषाढी एकादशीला पंढरपूरात वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. या दिवशी महाराष्ट्रासह, विविध राज्यातून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरात येतात. लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. यालाच आषाढी वारी म्हणतात. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्यामागे विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी दिंडी घेऊन जातात. ही वारी भक्ती, समर्पण आणि एकतेचे प्रतीक आहे. या एकादशीचे व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो अशी मान्यता आहे. भगवान विष्णूंची पूजा, उपवास आणि भक्ती यामुळे मन शुद्ध होते. महाराष्ट्रात आणि विशेषत: वारकरी संप्रदायात, आषाढी एकादशी हा उत्सव भक्ती, कीर्तन, भजन आणि सामूहिक प्रार्थनांनी साजरा केला जातो. पंढरीच्या वारी सोहळ्यात ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज असे दोन पालखी सोहळे असतात. शिवाय या वारी सोहळ्यात सकल संतांच्या पालख्याही सहभागी असतात. त्या दिंड्यांचे प्रमुख आपापल्या दिंडीचे संचालन आणि नियोजन करतात. 18 दिवस चालणाऱ्या या आषाढी वारी पालखी सोहळ्यात वारकरी आपले घर दार सोडून सहभागी होतात. शेतकरी, व्यापारी, नोकरदार, या सर्व वर्गातील भाविक या वारीत सहभागी होतात. या वारी सोहळ्यामधील धवलवस्त्राधरी वारकरी म्हणजे जणू शुद्धतेचे आणि सात्विकतेचे प्रतिक आहेत. पांढरा सदरा, धोतर, डोक्यावर टोपी, कपाळावर बुक्का, गळ्यांत तुळशीची माळ असा वारकऱ्यांचा पेहराव आहे. तर डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेतलेल्या महिला वारकरीही या सोहळ्यात मोठ्या संख्येने असतात.

Advertisement

‘पंढरीची वारी करी वारकरी उन्ह पावसाची चिंता कोण करी’ असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी किंवा लोक पंढरपूरला भेट देतात.

प्रा. डॉ. गिरीश नाईक

Advertisement
Tags :

.