पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी...
आषाढीसाठी भाविक दाखल : दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंटात हरिनामाचा जागर
संतोष रणदिवे/ पंढरपूर :
‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवणी,
प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे’
संत चोखामेळांच्या अभंगाप्रमाणे गेल्या 20 दिवसांचा प्रवास करून येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांना पंढरीचे सुख हे त्रिभुवनात सामावणार नाही असेच आहे. कारण या ठिकाणी प्रत्यक्ष परमात्मा विठोबा आहे. या एकाच भावनेतून एकादशीच्या पूर्वसंध्येला येथे लाखोंच्या आसपास भाविक दाखल झाले आहेत. पाऊसमान वेळेत झाल्याने भाविकसुद्धा पंढरीत मोठ्या भक्तिभावनेने दाखल झाले आहेत. एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शनिवारी पदस्पर्श दर्शन रांग ही गोपाळपूरच्यापुढे जाऊन पोहोचली होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त पंढरपुरात दाखल झाले आहेत. हरीनामाचा गजर करीत विठ्ठलाच्या भेटीसाठी धावा करीत दर्शन रांगेत उभे आहेत. मंदिर समितीकडून भाविकांसाठी दर्शन रांग
वॉटरप्रुफ उभारण्यात आली आहे. भाविकांना दर्शन रांगेत खिचडी व चहाचे वाटपसुद्धा करण्यात येत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधीच येथील प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करून सूचना केल्या आहेत. पंढरपुरात बुलेटवरून भक्तिसागर, दर्शनरांग, चंद्रभागा वाळवंटातील सोयी सुविधांची पाहणी करून भाविकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत. एकादशीच्या सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह सर्व मानांच्या संतांच्या पालख्या व दिंड्या पंढरीत येऊन विसावल्या आहेत. वाखरी येथून निघाल्यानंतर कॉलेज रोडसह सारा परिसर हा गर्दीने आणि माउलींच्या आणि व़िठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. सध्या संपूर्ण पंढरी नगरी विठ्ठलमय होऊन गजबजून गेली आहे.
नगरप्रदक्षिणा करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. याशिवाय चंद्रभागेमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असल्याने स्नानाचा आनंद भाविकांनी लुटला आहे. चंद्रभागा वाळवंटात महिला भाविकांसाठी चेंजींग ऊम, स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आलेली आहे. आपत्कालीन मदत केंद्रातून भाविकांना सूचना देण्यात येत आहेत. पोलिसांच्या सतर्क यंत्रणेमुळे कुठेही गोंधळ झालेला दिसून आलेला नाही
शहरातसुध्दा भाविकांच्यासाठी भक्तिसागर याठिकाणी राहण्याची सोय केलेली आहे. याठिकाणी राहुट्या उभारून वारकरी वास्तव्यास आहेत. वीज, पाणी, सुरक्षा यांची सोय करण्यात आली असून आरोग्य विभागाकडून याठिकाणी लाखो भाविकांची आरोग्य तपासणीसुद्धा करण्यात येत आहे. भक्तिसागर परिसरात मूर्ती, प्रासादिक वस्तू, टाळ, मृदंग, वीणा, माळ आदींची दुकानेसुद्धा मोठ्या प्रमाणात थाटलेली आहेत. त्यामुळे याठिकाणचा तीन रस्ता परिसरातील रस्ता हा व्यापून गेला होता.
वैष्णवांचा रात्रभर हरिजागर
आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी प्रमुख संतांच्या पालख्यांसमवेतच मोठ्या संख्येने भाविकांची दाटी पंढरपुरात झालेली दिसून आली. त्यामुळे एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरात हरिजागर झालेला दिसून आला. त्यामुळे अवघी पंढरी नगरी एकादशीपूर्वीच दुमदुमण्यास सुऊवात झाली होती. भक्तिसागर व पंढरपूर शहरात वैष्णवांकडून हरिनामाचा जागर करण्यात येत होता.
भाविकांना विठ्ठल दर्शनाची आस
आषाढी यात्रा सोहळा मोठ्या उत्साहात भाविक नयनांनी अनुभवत आहेत. पालख्यांमध्ये दाखल झालेले वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेले आहेत. आषाढी यात्रेतील शेवटचा रिंगण सोहळा लक्ष-लक्ष नयनांनी अनुभवला. अश्वांनी रिंगण पूर्ण करताच भाविकांनी एकज जल्लोष केला. या रिंगण सोहळ्याप्रसंगी भाविकांत मोठ्या प्रमाणात भक्तिभाव उत्साह दिसून आला. त्यानंतर पालख्यांनी पंढरीकडे प्रस्थान केले.