पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी...
- आषाढी सोहळ्यासाठी 15 लाखांहून अधिक भाविक दाखल : - मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शासकीय महापूजा
प्रतिनिधी
पंढरपूर
‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी,
प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे’
संत चोखामेळांच्या अभंगाप्रमाणे गेल्या 18 दिवसांचा प्रवास करून येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांना पंढरीचे सुख हे त्रिभुवनात सामावणार नाही असेच आहे. कारण या ठिकाणी प्रत्यक्ष परमात्मा विठोबा आहे, या एकाच भावनेतून एकादशीच्या पूर्वसंध्येला येथे सुमारे 15 लाखांच्या आसपास भाविक दाखल झाले आहेत. पाऊसमान काही ठिकाणी वेळेत झाल्याने भाविकसुद्धा पंढरीत मोठ्या भक्तिभावनेने दाखल झाले आहेत. एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात येणार आहे.
शुक्रवारी पदस्पर्श दर्शन रांग ही गोपाळपूरच्या पुढे जाऊन पोहोचली होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त पंढरपुरात दाखल झाले आहेत. तर लाखो भाविक हरिनामाचा गजर करीत विठ्ठलाच्या भेटीसाठी धाव करीत दर्शन रांगेत उभे आहेत. मंदिर समितीकडून दर्शन रांग वॉटरप्रूफ उभारण्यात आली आहे. भाविकांना दर्शन रांगेत शाबू खिचडी व चहाचे वाटपसुद्धा करण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधी येथील प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करून सूचना केल्या आहेत. पंढरपुरात भर पावसात द्रुतगती मार्गावरील, दर्शनरांग, भक्तिसागर, चंद्रभागा वाळवंटातील सोयी सुविधांची पाहणी करून भाविकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत.
एकादशीच्या सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह सर्व मानांच्या संतांच्या पालख्या व दिंड्या पंढरीत येऊन विसावल्या आहेत. वारी येथून निघाल्यानंतर कॉलेज रोडसह सारा परिसर हा गर्दीने आणि माउलीच्या आणि विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. सध्या संपूर्ण पंढरी नगरी विठ्ठलमय होऊन गजबजून गेली आहे.
चंद्रभागा नदीपलीकडे भक्तिसागर (65 एकर) येथे दिंड्या विसावल्या आहेत. राज्यभरातून भाविक येथे येत राहुट्या उभारून वास्तव्य करीत आहेत. भाविक भक्तांकडून हरिनामाचा गजर करण्यात येत आहे. प्रशासनाकडून याठिकाणी आरोग्य, वीज, पाणी, सुरक्षा व इतर अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
वैष्णवांचा हरिनामाचा जागर
आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी प्रमुख संतांच्या पालख्यांसमेवत मोठ्या संख्येने भाविकांची दाटी पंढरपुरात शुक्रवारी झालेली दिसून आली. त्यामुळे एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरात हरिजागर झालेला दिसून आला. त्यामुळे अवघी पंढरी नगरी एकादशीपूर्वीच दुमदुमण्यास सुरुवात झाली होती. भक्तिसागर व पंढरपूर शहरात वैष्णवांकडून हरिनामाचा जागर करण्यात येत होता.
भाविकांमध्ये भक्तीभाव उत्साहात
आषाढी यात्रा सोहळा मोठ्या उत्साहात भाविक नयनांनी अनुभवत आहेत. पालख्यांमध्ये दाखल झालेले वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेले आहेत. आषाढी यात्रेतील शेवटचा रिंगण सोहळा लक्ष-लक्ष नयनांनी अनुभवला. अश्वांनी रिंगण पूर्ण करताच भाविकांनी एकच जल्लोष केला. या रिंगण सोहळ्याप्रसंगी भाविकांत मोठ्या प्रमाणात भक्तिभाव उत्साह दिसून आला. त्यानंतर पालख्यांनी पंढरीकडे प्रस्थान केले.