For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Breaking | पाचगणी हादरलं! जुन्या स्टॅम्प पेपरचा गैरवापर करून कोट्यवधींचा घोटाळा; मुख्य सूत्रधार भरत घरत फरार

12:35 PM Apr 11, 2026 IST | NEETA POTDAR
satara breaking   पाचगणी हादरलं  जुन्या स्टॅम्प पेपरचा गैरवापर करून कोट्यवधींचा घोटाळा  मुख्य सूत्रधार भरत घरत फरार
Advertisement

                                पाचगणी-वाईमध्ये स्टॅम्प पेपर घोटाळा उघड

Advertisement

पाचगणी -वाई तालुक्यात स्टॅम्प पेपरचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून भरत अनंत घरत याचे नाव तक्रारीनुसार पुढे आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात प्रतिक घरत व कमलेश म्हात्रे यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, मुख्य आरोपी अद्यापही फरार असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तक्रारीनुसार, संबंधित आरोपींनी जुन्या तारखांचे स्टॅम्प पेपर वापरून खोटे व्यवहार दाखवले. काही प्रकरणांमध्ये २०१० सालचे स्टॅम्प पेपर २०२४ मध्ये वितरित झाल्याचे दाखवून बनावट पावत्या तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे केवळ आर्थिक व्यवहारच नव्हे, तर न्यायालयीन प्रक्रियेलाही गंडा घालण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींनी संगनमत करून खोट्या सही, बनावट शिक्के आणि खोटी पावती तयार करून मोठ्या रकमेचे व्यवहार दाखवले. विशेष म्हणजे, काही व्यवहारांमध्ये स्टॅम्प विक्रेत्याचा परवाना रद्द झाल्यानंतरही त्याच्या नावाने कागदपत्रे तयार करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठ्या रॅकेटचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, या गंभीर प्रकरणाची माहिती संबंधित यंत्रणांना देण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी मुख्य आरोपी भरत घरत अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याचे सांगितले जात आहे. अनेक दिवस उलटूनही आरोपीचा ठावठिकाणा लागलेला नसल्याने वाई परिसरात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

“अखेर आरोपीला संरक्षण कोण देत आहे?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काहींच्या मते, या प्रकरणात प्रभावशाली व्यक्तींचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच तपासाची गती संथ असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.

याहून धक्कादायक बाब म्हणजे, बनावट स्टॅम्प पेपरच्या आधारे न्यायालयीन प्रकरणांमध्येही कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा आरोप समोर येत आहे. जर हे आरोप पुढील तपासात सिद्ध झाले, तर हा प्रकार केवळ फसवणूक नसून न्यायव्यवस्थेलाही आव्हान देणारा गंभीर गुन्हा ठरू शकतो.

वाई पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असला, तरी मुख्य सूत्रधाराचा माग काढण्यात अजूनही यश आलेले नाही. त्यामुळे “वाई पोलीस आरोपींना कधी अटक करणार?” असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.या संपूर्ण घोटाळ्यामुळे स्टॅम्प पेपर व्यवहारांवरील विश्वास डळमळीत झाला असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची गरज व्यक्त होत आहे. नागरिकांचे लाखो-कोट्यवधी रुपये धोक्यात घालणाऱ्या या घोटाळ्याचा छडा लावून दोषींना कठोर शिक्षा देणे हीच काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

आता सर्वांचे लक्ष वाई पोलिसांच्या पुढील कारवाईकडे —

मुख्य आरोपी भरत घरत आणि त्याच्या सहकाऱ्यांना कधी जेरबंद केले जाणार?हा प्रश्न सध्या संपूर्ण वाई तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

Advertisement
Tags :

.