पंचगंगा रूग्णालय बनले ऑक्सिजन पार्क; रूग्णालयातच उभारली औषधी बाग व टेरेस गार्डन
प्रत्येक वॉर्डमध्ये सुगंधित शोभेचे झाड; उपचारासह नैसर्गिक वातावरणाची निर्मिती; रूग्णांच्या तणावमुक्तीसाठी लाभ ; औषधी वनस्पतींचे संवर्धन व प्रबोधन; खासगी रूग्णालयासारखी स्वच्छता
इम्रान गवंडी कोल्हापूर
केवळ आरोग्य सेवेपुरते मर्यादित न राहता महापालिकेच्या पंचगंगा रूग्णालयात ऑक्सिजन पार्क व मेडिसिन गार्डनची निर्मिती केली आहे. झाडे लावा, झाडे जगवा च संदेश देत, रूग्ण व नातेवाईकांचा मानसिक ताण-तणाव कमी व्हावा, मन प्रसन्न रहावे, औषधी वनस्पतींच्या संवर्धनाच्या उद्देशाने रूग्णालयातच बगीचा फुलवला आहे.
शोभेच्या झाडांबरोबरच रूग्णालयाच्या मोकळ्या जागेत मेडिसिन गार्डन (औषधी बगीचा) तयार केला आहे. यामध्ये गुणकारी तुळस, जखमेवर प्रभावी कोरफड व दगडीपाला, खोकल्यावर गुणकारी अडूळसा, जुलाब आणि आव यासाठी उपयुक्त कुडा झाड व आजवाईन, अश्वगंधा आदी औषधी वनस्पती लावल्या आहेत. या औwषधी वनस्पतींचे महत्व रूग्णांना सांगितले जाते. शरीरासाठी गुणकारी औषधी वनस्पीतींचे संवर्धन व प्रबोधन करण्याचे काम रूग्णालय प्रशासनाकडून होत आहे.
वातावरणातील ऑक्सिजन निर्मितासह वायुप्रदुषण रोखणयासाठी झाडांचा विशेष उपयोग होतो. रूग्णालयाच्या टेरेसवर विविध प्रकारची झाडे लावली आहेत. टेरेस गार्डनसह रूग्णालयातील प्रत्येक वॉर्डमध्ये शोभेची झाडे लावल्यामुळे रूग्णालयातील वातावरण निसर्गमय बनले आहे. सुमारे 40 कुंड्यामध्ये लावलेल्या विविध जातीच्या सुगंधित शोभेच्या झाडांनी रूग्णांना तणामुक्तीसाठी लाभ होत आहे.
प्रसुतीपूर्व व प्रसुती पश्चात दर्जेदार सेवा देण्यासाठी शुक्रवार पेठेतील महापालिकेच्या पंचगंगा रूग्णालयाचा नावलौकीक आहे. मोफत व माफक दरात शहरासह ग्रामीण भागातील गरीब व गरजू रूग्णांना हे रूग्णालय आधारवड ठरत आहे. मोफत लसिकरण, शासनाच्या विविध योजना, टापटीप स्वच्छता, गर्भवतींसाठी लोहृ रक्तवाढीसाठी लागणारी मुबलक औषधे, मोफत स्वाईन फ्लू लस, रूग्णांसाठी मोफत चहा नाष्टा आदी सोयी सुविधा उपलब्ध आहेत. मोफत कुटुंब नियोजन शास्त्रक्रिया, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनासह मोफत एकात्मिक समुदेशन व चाचणी केंद्रामुळे गर्भवती महिलांना याचा लाभ होत आहे. तसेच याठिकाणी उपचारासाठी नेहमीच गर्दी असते.
तणाव, नैराश्य, चिंतामुक्तीसाठी लाभ
प्रत्येक रूग्णालयात येणारा नागरिक नेहमी तणाव व चिंतेत असतो. झाडांच्या सानिध्यात राहील्यास मन प्रसन्न राहते व तणामुक्तीसाठी लाभ होतो, असा तज्ञांनी अहवाल दिला आहे. याच उद्देशाने रूग्णालयाच्या प्रत्येक वार्डमध्ये रूग्णाच्या समोर कुंडीच्या आधारे झाड ठेवले आहे. तसेच रूग्णालयाच्या प्रत्येक विभागात झाडांचे संगोपण केले आहे. रूग्ण व रूग्णांचे नातेवाईक येथील नैसर्गिक वातावरणमुळे समाधान व्यक्त करत आहेत.
कर्मचाऱ्यांकडून विशेष निगा
रूग्णालयात लावलेल्या झाडांची निगा राखण्यासाठी सर्वच कर्मचारी योगदान देतात. दैनंदिन कामातून वेळ काढून औषधी वनस्पतींचे संवर्धन करणे, झाडांना पाणी घालणे, झाडांच्या सभोवती वाढलेले अनावश्यक गवत काढणे, टेरेस गार्डनची देखभाल करणे आदी कामे काटेकोरपणे केली जातात.
औषधी वनस्पींच्या संवधंनची गरज
उत्कृष्ठ सेवेसह रूग्णालय टापटिप, स्वच्छ रहावे, यासाठी विशेष लक्ष दिले जाते. औषधी वनस्पतींच्या संवर्धन करण्याची गरज आहे. रूग्णांचा तणाव कमी होऊन मन प्रसन्न रहावे, या उद्देषाने रूग्णालयाच्या प्रत्येक विभागासह परिसरात विविध झाडांसह औषधी वनस्पींची निर्मिती केली आहे. सर्वच कर्मचारी झाडांची निगा राखतात.
डॉ. विद्या काळे, पंचगंगा रूग्णालय विभाग प्रमुख