अनधिकृत बांधकामांची यादी देण्यास पंचायतींना 30 मार्चपर्यंतची मुदत
पणजी : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लब’मध्ये लागलेल्या आगीत 25 जणांच्या मृत्यूची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सु मोटो गंभीर दखल घेतल्यानंतर दोन्ही जिह्यातील किनारपट्टीवरील 26 पंचायतींना आपापल्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची यादी देण्याची शेवटची ताकीद दिली आहे. या पंचायतींनी 30 मार्चपर्यंत सदर माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे न दिल्यास त्यांच्या सचिवांना हजर राहून खुलासा करण्याचा सक्त आदेश दिला आहे.
याप्रकरणी न्यायालयाने ‘स्वेच्छा दखल’ घेत आणखी 52 जणांना प्रतिवादी केले आहे. याशिवाय जमिनीचे फरारी मालक सुरिंदर कुमार खोसला आणि गौरव व सौरभ लुथरा तसेच हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकर आणि क्लब मालकांना त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यासाठी वैयक्तिक प्रतिवादी बनवण्यात आले आहे. किनारपट्टीवरील पंचायतींना आपापल्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाची यादी आणि त्यावरील कारवाईचा अहवाल देण्यास मागील सुनावणीवेळी बजावले होते.त्या आदेशाची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्याची जबाबदारी पंचायत संचालनालयावर टाकण्यात आली आहे.
सोमवारी सुनावणीवेळी यातील मोजक्या पंचायतींनी प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे समजताच न्या. वाल्मिकी मिनेझिस यांनी नाराजी व्यक्त करताना, त्यांचा ‘हजेरीपट’च घेतला. अनेक पंचायतींनी आपला कायदेशीर वकील पाठवण्याचीही तसदी न घेतल्याने त्यांना एक आठवड्याची अंतिम मुदत देताना 30 मार्च रोजी अहवाल सादर करण्यास सांगितले.
अजय गुप्ताची जामिनवर सुटका
‘बर्च’ नाईट क्लब अग्नितांडव प्रकरणातील संशयित आरोपी क्लबचा सहमालक अजय गुप्ता याची म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी सोमवारी सशर्त जामिनावर सुटका केली आहे. 50 हजार ऊपये हमी रक्कम आणि तितक्याच रकमेचा हमीदार तसेच इतर अटींवर न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला आहे.