पंचायतींच्या निवडणुका पुढील वर्षीच!
मार्चअखेरपर्यंत निवडणुका घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच : यंदा शक्यता धूसर
त. भा. प्रतिनिधी /बेंगळूर :
गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या तालुका, जिल्हा आणि ग्राम पंचायतींच्या निवडणुकांना आता पुढील वर्षाचाच मुहूर्त मिळणार आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी शुक्रवारी याबाबत सुतोवाच केले आहे. त्यामुळे यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता धूसर बनली आहे.
ग्रेटर बेंगळूर प्राधिकरणांतर्गत बेंगळूर शहरातील पाच नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी, मतदार यादीच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया सुरू असल्याने बेंगळूरमधील नगरपालिकांच्या निवडणुका घेण्यासाठी 31 डिसेंबरर्पंय मुदत मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याची दखल घेतली आहे. त्यानुसार बेंगळुरात निवडणुका घेतल्या जातील. या व्यतिरिक्त जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत आणि कार्यकाळ संपलेल्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी मार्च अखेरपर्यंत घेतल्या जातील, असे सांगितले.
निवडणुकांत तरुणांना संधी
ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकेपर्यंत, सर्वच निवडणुकांमध्ये तरुणांना आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्यासाठी व सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी संविधानात करण्यात आलेल्या 73 व्या आणि 74 व्या दुरुस्तीची अंमलबजावणी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मागील आठवड्यात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या प्रारंभी पंचायतींच्या निवडणुका घेतल्या जातील असे सांगितले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचाली गतीमान झाल्या होत्या. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये तयारीसाठी लगबग सुरू झाली होती. मात्र, शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी मार्चअखेरपर्यंत निवडणुका घेणार असल्याचे सांगितल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये पुन्हा नाराजी पसरली आहे. 
आज खर्गेंची भेट घेणार!
राज्य मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी दिल्लीत पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. मात्र, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट होऊ न शकल्याने त्यांनी शनिवारी भेट घेण्यात येईल. नेत्यांकडून मार्गदर्शन घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी केली जाईल.
- डी. के. शिवकुमार, मुख्यमंत्री