पंचायतींच्या निवडणुका जानेवारीपर्यंत
ग्रामविकास मंत्री ईश्वर खंड्रे यांची माहिती
त. भा. प्रतिनिधी /बेंगळूर :
राज्य सरकार अधिकाराच्या विकेंद्रीकरणाच्या बाजूने असून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आरक्षणाबाबत मसुदा अधिसूचना जारी केली आहे. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत निश्चितपणे जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायतींच्या निवडणुका घेतल्या जातील, असे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री ईश्वर खंड्रे यांनी स्पष्ट केले आहे.
शनिवारी बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाबाबतच्या मसुदा अधिसूचनेवर आक्षेप नोंदवता येतील. आतापर्यंत 2,000 हून अधिक आक्षेप प्राप्त झाले आहेत. नियमांनुसार अधिकारी त्यांची पडताळणी करत असून, लवकरच अंतिम अधिसूचना जारी केली जाईल.
राज्य सरकारने आपला प्रस्ताव सादर केल्यानंतर, राज्य निवडणूक आयोग निवडणुका घेण्यासाठी आवश्यक पावले उचलेल. यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या मिळवणे किंवा उपलब्ध असलेल्या मतदार याद्यांमध्ये सुधारणा करणे, अशा प्रक्रियांचा समावेश असेल, असे ते म्हणाले.
तालुका आणि जिल्हा पंचायतींच्या निवडणुका जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जातील, असे संकेत ग्रामविकास मंत्री ईश्वर खंड्रे यांनी संकेत दिले.
आगामी जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी (इव्हीएम) मतपत्रिकांचा (बॅलेट पेपर) वापर करण्यास परवानगी देण्यासाठी पंचायत राज कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. सर्वप्रथम जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्या जातील आणि त्यानंतरच ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जातील, असा निर्णय राज्य सरकार आणि मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला आहे.
