हारुगेरीत उद्या पंचमसाली प्रतिज्ञा क्रांती मेळावा
जगद्गुरु बसवजय मृत्युंजय महास्वामी यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून पंचमसाली समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी समाजबांधव आंदोलन करत आहेत. मात्र प्रत्येकवेळी आश्वासन देऊन याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रायबाग तालुक्यातील हारुगेरी येथे शनिवार दि. 20 रोजी सकाळी 11 वाजता पंचमसाली प्रतिज्ञा क्रांती मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कुडलसंगमचे जगद्गुरु बसवजय मृत्युंजय महास्वामीजी यांनी दिली. कन्नड साहित्य भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महास्वामीजी म्हणाले, सकाळी 10 वाजता हारुगेरी क्रॉसपासून ते चन्नवृषभेंद्र लिलामठापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर मिरवणुकीचे रुपांतर मेळाव्यामध्ये होणार आहे.
यामध्ये राज्यभरातील समाज बांधव सहभागी होणार असून आरक्षणाबाबत लढा देण्याबाबतचा निर्धार करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारकडून पंचमसाली आरक्षणाच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध मार्ग अवलंबण्यात येत आहेत. यादृष्टीने हारुगेरी येथे समाजबांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानंतर विविध ठिकाणी मेळावे घेऊन समाज बांधवांना एकत्र आणण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून जाती जनगणना करण्यात येणार आहे. गणतीवेळी लिंगायत पंचमसाली नमूद करण्याचे आवाहन महास्वामीजी यांनी केले. यावेळी सुधाकर पाटील, गुंडू पाटील, लिंगण्णा करिकट्टी, आर. के. पाटील, पी. सी. नेगीनहाळ आदी उपस्थित होते.