वाळवा येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचा प्रारंभ
वाळवा :
येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाला आज पासुन प्रारंभहोत आहे. कोटभाग नागठाणे रस्ता येथे सहा दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल चालणार आहे. श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर वाळवा येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायाग १४ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी होणार आहे. यानिमित्ताने वाळवा नगरीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. इंद्र इंद्रायणीचा मान आदर्श व्यक्तीमत्व महावीर बबन होरे व डॉ. वंदना महावीर होरे यांना मिळाला आहे. या कार्यक्रमांसाठी १०८ परमपूज्य आचार्य श्री वर्धमान सागर जी महाराज, परमपूज्य १०८ निर्यापक श्रमण श्री धर्मसागरजी महाराज, परम पूज्य १०८ निर्यापक श्रमण विद्यासागरजी महाराज तसेच सहसंघ विराजमान आहेत. पूजा विधीसाठी प्रतिष्ठाचार्य म्हणून नेज कुंभोज येथील संदेशजी उपाध्ये हे काम पाहणार आहेत. हुतात्मा पतसंस्थेचे माजी अध्यक्ष पोपट होरे यांच्या ३ एकर शेतामध्ये ४०० फूट बाय १५० फुट भव्य शामियाना (मंडप) उभारण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी विविध प्रांतातील जैनमुनींचे आगमन वाळवा येथे होणार आहे. त्यांचे पावन सानिध्य मिळणार असल्यामुळे मोठा उत्साह आहे.
समस्त जैन बांधवांच्या वतीने या कार्यक्रमाची जय्यत तयारी पुर्ण झाली आहे. १६ वर्षानंतर प्रथमच हा कार्यक्रम होत आहे. या पार्श्वभूमीवर कोठभाग येथील जीन मंदिराच्या कलशाचे व भगवंत वेदीचे नूतनीकरण झाले आहे. गेल्या ६ महिन्यापासून समस्त जैन बांधव या कार्यक्रमाची तयारी करीत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावात सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
स्वागत कमानी, भव्य डिजिटल उभारण्यात आले आहेत. कार्यक्रमासाठी अनेक जिल्ह्यामधून श्रावक-श्राविका येणार आहेत. जैन बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या भोजन व निवासाची सोय सुद्धा करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी अनेक व्ही. आय.पी. व मान्यवर येणार आहेत. वाहनांसाठी प्रशस्त असे वाहनतळ उभारले आहे. सभामंडपामध्ये सात हजार लोक बसतील अशी बैठक व्यवस्था केली आहे.
संजय होरे, वर्धमान मगदूम, पोपट होरे, यशपाल होरे, बब्बर होरे, वाळवा कोटभाग येथील वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, धर्मसागर पाठशाळा, गोमटेश ग्रुप, विराचार्य झांज पथक वाळवा, १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, सकल दिगंबर जैन समाज बांधव है पंचकल्याणक महोत्सव दिमाखदारपणे व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.