महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘पनौती’ कोणाला?

06:17 AM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये गेल्या आठवड्यात विश्वचषक सामन्यात भारत हारला आणि त्याने पाच राज्यांच्या निवडणूकांत भाजपची अवस्था अवघड आणि अशुद्ध केली आहे. ज्या परिस्थितीत भारताचा पराभव झाला त्याला सर्वस्वीपणे साक्षात पंतप्रधान जबाबदार आहेत अशी मोहीम विरोधी पक्षांनी सुरु करून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले आहे, असे दिसत आहे. आवडो अथवा नावडो, पण क्रिकेटचे वेड देशात एव्हढे पसरले आहे की तो एक धर्मच झाला आहे. अशावेळी प्रचाराचा शेवटचा आठवडा उरलेला असताना प्रत्येक मत हे महत्त्वाचे. निवडणूकात तुफान चुरस झाली आहे. राहुल गांधी यांनी मोदींना उल्लेखून ‘पनौती’ हा शब्द वापरला असा आरोप करून भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. याचा अर्थ ‘अपशकुनी’ असा अर्थ असलेल्या या हिंदी शब्दाने ते अतिशय चिडलेले आहेत असे मानले जाते. राहुल असे बोललेलेच नाहीत जनता जनार्दन बोलत आहे, अशी फिरकी घेऊन काँग्रेस मजा घेत आहे. लोकसभा निवडणूक जवळ येत असताना ‘अपशकुनी’ टॅग हा कोणालाही घातक ठरणार आहे, घायाळ करणारा आहे.

Advertisement

वेगवेगळ्या कारणांमुळे काँग्रेस आणि भाजप अडचणीत आलेली आहे. सर्वात जास्त अटीतटीची झुंज निर्माण झालेल्या राजस्थानमध्ये दोन्ही पक्षांना बंडखोरांची भीती सतावत आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत आणि अश्विनी वैष्णव, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला अशी भाजपमधील मंडळी मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने बघत आहेत तर श्रेष्ठींनी एक प्रकारे सायडींगला काढलेल्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे याच खऱ्या मैदानात दिसत आहेत. खरे खोटे काळच जाणो, पण मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राजे हे दोघेही राजस्थानातील घाग मंडळी मानली जातात आणि जमलं तर दोघेही नवीन डाव खेळू शकतात. राजस्थानमध्ये सर्वात जास्त चुरशीचा सामना झाला आहे आणि भाजपने कोणाला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले नसल्याने तेथील कुस्ती ही मोदी विरुद्ध गेहलोत अशी झाली आहे. ती जर जिंकली तर गेहलोत फक्त मोठे होतात असे नाही तर ब्रँड मोदीची किंमत कमी होते. एक प्रकारे पंतप्रधानांनी तिथे स्वत:चीच गोची करून घेतली आहे. राजे यांना धडा शिकवण्याच्या नादात असे झाले आहे.

Advertisement

राजस्थानमध्ये जर त्रिशंकू विधानसभा आली तर बंडखोर आमदारांची मदत घेऊन सरकार स्थापण्याचा देखील ते वेगवेगळा प्रयत्न करू शकतात अशी चर्चा आहे. स्थानिक राजकारणात या दोन नेत्यांच्या पासंगाला पुरणारा एकहीजण नसल्याने बंडखोर फोडून आपल्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालण्याची क्षमता फक्त त्यांच्यातच आहे. अशा परिस्थितीत पक्षनेतृत्वाला मम् म्हणण्याशिवाय पर्याय राहणार नाही. 200 सदस्यीय विधानसभा निवडणुकीत भाजपचे 22 तर काँग्रेसचे 17 बंडखोर मैदानात आहेत. त्यातील कमीतकमी निम्मे तरी शक्तिशाली मानले जातात. तेलंगणात दिवसेंदिवस काँग्रेसची हवा वाढत असल्याने गेली दहा वर्षे मुख्यमंत्रीपदी असलेले के चंद्रशेखर राव यांना घाम फुटला आहे. भाजपची अवस्था तर पाप्याचे पीतर झालेली आहे. कधीकाळी आंध्रप्रदेश तसेच तेलंगणाचे पक्षप्रमुख असलेले माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना परत प्रभारी बनवून हैद्राबादकडे  रवाना करण्यात आलेले आहे. ते शर्थीचे प्रयत्न करत आहेत पण चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती आणि भाजप यांचे गुळपीठ आहे, अशी भावना वाढीस लागल्याने काँग्रेसच्या शिडात वारे भरले आहे. मुख्यमंत्र्यांच्या परिवाराने गेल्या दहा वर्षांत बरीच ‘लूट’ केली ही विरोधकांची मोहीम प्रभावी ठरत आहे. प्रशांत किशोर यांना ऐनवेळी सल्लागार म्हणून आणण्याचा राव यांचा बेत फसला. राज्यातील एकूण रागरंग बघून किशोर यांनी दूर राहणे पसंत केले, असे बोलले जाते. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार भाजपने तेलंगणातील लढाईत अगोदरच हार मानलेली आहे. गुगल वर राव यांच्या पक्षाने 7.2 कोटी खर्च केले आहेत तर काँग्रेसने 5.40 कोटी. भाजपने अवघे 32 लाख खर्च करून आपण स्पर्धेतच नाही असे दाखवले आहे.

तेलंगणात जशी हवा पालटू लागली तसेच दूर असलेल्या उत्तरप्रदेशात खळबळ माजायला सुरुवात झालेली आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष जणू हवालदिल झाला आहे. जर तेलंगणातील मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणावर काँग्रेसकडे शिफ्ट झाला तर उत्तरेकडे देखील तो रातोरात टोपी फिरवेल या भीतीने अखिलेश घाबरले आहेत. ‘पिछरा, दलित, अल्पसंख्यांक’, अशी घोषणा देत अखिलेश यांनी नुकतीच राज्यात यात्रा काढली होती. त्यांच्या या यात्रेने सावध झालेल्या भाजपने बऱ्याच जिल्यात गैर-यादव मागासवर्गीय नेते नुकतेच पुढे आणले आहेत.

उत्तरप्रदेशातील काँग्रेस नेते सुखावले आहेत. राहुल गांधी हे येती लोकसभा निवडणूक अमेठीतून लढवणार आहेत, असे उत्तरप्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी जाहीर केले आहे. संजय गांधी यांचे सुपुत्र आणि भाजपमधील असंतुष्ट नेते वरुण गांधी यांनी गरिबी, बेरोजगारी, वाढती विषमता या विषयांवर मोदी सरकारवर जी जहाल टीका सुरु केलेली आहे, त्याने सत्ताधारी वर्तुळात खळबळ माजली आहे. डिसेंबर 3 ला पाच राज्यांच्या निवडणूक निकालात भाजपाला बऱ्यापैकी यश मिळाले तर पहिली गोष्ट म्हणजे वरुण यांना बाहेरचा रास्ता दाखवला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. पण या निवडणूकात भाजपने मार खाल्ला तर ‘आपण किती बरोबर आहोत’ असा प्रचार ते करू शकतात. त्यांच्या आई मनेका गांधी यांना सद्य लोकसभेत मंत्री न बनवून अथवा कोणतीही जबाबदारी न देऊन मोदी-शहा यांनी त्या आता पक्षाला फारशा कामाच्या नाहीत असेच जणू जाहीर केले  होते. गेल्या महिन्यात वरुण हा केदारनाथ येथे राहुल यांना भेटला तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात विविध वावड्या उठू लागल्या आहेत. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हे वरुण गांधींचे मित्र आहेत आणि ते तिकडे देखील जाऊ शकतात. केवळ 43 वर्षाचे असलेले वरुण हे महत्वाकांक्षी असल्याने योगी आदित्यनाथ यांनादेखील ते आवडत नाहीत. वरुण उत्तर प्रदेशातील ब्राह्मण समाजाचा नेता बनले तर आपल्याला त्रास होऊ शकतो, अशी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भीती आहे. डिसेंबर 3 नंतर वरुण जास्त सक्रिय होऊ शकतात.

विश्वचषक भारताने जिंकला असता तर दिग्विजयी भारतीय क्रिकेट संघाचा वापर करून राजस्थानमध्ये मोदींना ‘ब्लू जर्सी’ मध्ये दाखवून एक जबरदस्त प्रचार मोहीम भाजपने आखली होती असे आरोप विरोधी पक्षांकडून होऊ लागले आहेत.

त्याचा म्हणावा तसा प्रत्यवाय भाजपला करता आलेला नाही. याउलट ‘पनौती’ वरून विरोधी पक्षांच्या मोहिमेला धार येत आहे. अहमदाबादमध्ये ‘पापी’ लोकांच्या सान्निध्यामुळे भारत हारला असे सांगत ममता बॅनर्जी आपण बंगालमध्ये भाजपचे बारा वाजवणार असे जाहीर करत आहेत. निवडणूक आयोग याबाबत काहीही निर्णय देवो विरोधी पक्षांची लोकसभेची मोहीमच जणू सुरु झाली आहे. ईडीने नॅशनल हेराल्डच्या करोडोच्या मालमत्तेवर आत्ताच टाच आणून तसेच गेहलोत यांचा मुलगा वैभव याला चौकशीला बोलावून सत्ताधारी किती भडकलेले आहेत, याचीच जणू चुणूक दाखवली आहे. ‘अति झाले आणि हसू आले’ असाच सूर विरोधकांनी लावल्याने येत्या काळात सत्ताधाऱ्यांना जास्त हैराण करण्याची चावीच जणू बिगर भाजप पक्षांच्या हाती लागली आहे, असे दिसत आहे. पुढील रविवारी पनौती कोणाला लागली हे कळणार आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article