पाटो पूल बंद ठेवल्यामुळे पणजी वाहनांची केंडी
पणजी : पणजी शहरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या पाटो पुलाची एक लेन दुरूस्तीकरीता बंद केल्यामुळे काल शुक्रवारी कदंब पणजी बसस्थानक परिसर, डॉ. आंबेडकर उद्यान तसेच बांबोळीकडे जाणाऱ्या जुन्या रस्त्यावर सकाळच्या सत्रात वाहनांची मोठी केंडी झाली. अनेक वाहनचालकांना गैरसोय सोसावी लागली. पणजी शहरात येण्याकरीता वाहतूक जुन्या पाटो पुलावरून वळवण्यात आली आहे. चारचाकी, दुचाकी वाहने मोठ्या संख्येने आल्यामुळे तेथे पुलावरही वाहनांचा चक्काजाम झाल्याने वाहनचालक हैराण झाले. जे वाहनचालक रोज वर्तमानपत्र वाचत नाहीत, अशा अनेक वाहनचालकांना पाटो पूल बंदची कल्पनाच नव्हती. सर्व दैनिकांनी पूल बंद राहणार असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती, तरीही ती न वाचल्यामुळे अनेकांना पूण अचानक बंद केल्याचे वाटून त्यांनी संताप व्यक्त केला. बंदचा आदेश गुरूवारी सायंकाळी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला होता. शुक्रवारी सकाळी बंदची कार्यवाही करण्यात आली.
वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे सकाळच्या वेळी अनेकजण कामाच्या ठिकाणी उशिरा पोहोचले. दुपारपर्यंत वाहतूक कोंडी दिसून आली. नंतर मात्र ती कमी झाली. जुना पाटो पूल पार केल्यानंतर मात्र वाहतूक सुरळीत झाल्याचे चित्र होते. येत्या सोमवारी 14 एप्रिलपर्यंत सदर पाटो पूल (एक लेन) बंद रहाणार आहे. त्यामुळे आणखी तीन दिवस वाहनचालकांना त्रास होण्याची चिन्हे आहेत. अर्थात शनिवार-रविवार-सोमवार असे तीन दिवस सरकारी सुटी असल्यामुळे वाहनांची संख्या कमी असेल, असा अंदाज आहे. पणजी शहराबाहेर जाण्यासाठी असलेली पाटो पुलाची दुसरी लेन सुरळीतपणे चालू होती. चर्च चौक, कोर्तीनामधून पणजीबाहेर जाण्यासाठी वाहनांना मळा येथील नवीन पुलाचा वापर करावा अशी सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे त्या पुलापर्यंत वाहनांची गर्दी दिसून आली. तसेच कदंब बसस्थानकाकडून कला च् संस्कृती संचालनालयाकडे जाणारा रस्ताही वाहतूक कोंडीत सापडला होता.