For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉक्टर दाम्पत्य पर्यटनाला गेले अन् फ्लॅट फोडला; पणजीत 100 ग्रॅम सोन्यासह चांदीचा ऐवज लंपास

12:24 PM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
डॉक्टर दाम्पत्य पर्यटनाला गेले अन् फ्लॅट फोडला  पणजीत 100 ग्रॅम सोन्यासह चांदीचा ऐवज लंपास
Advertisement

पणजी : राजधानी पणजीतील सांतइनेझ परिसरातील उच्चभ्रू निवासी अपार्टमेंटमध्ये धाडसी घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. घरमालक बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी फ्लॅटचा मागील दरवाजा तोडून घरातील सुमारे 100 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, मनगटी घड्याळ आणि तांबे-पितळेची भांडी असा ऐवज लंपास केला.

Advertisement

सांतइनेझ येथील ‘त्रिवेणी’ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या डॉ. सबिना मार्टिन्स (62) या आपल्या पतीसह 28 मे रोजी कर्नाटकातील कुर्ग येथे पर्यटनासाठी गेल्या होत्या. 31 मे रोजी रात्री सुमारे 11 वाजता त्या घरी परतल्यानंतर फ्लॅटचा मागील दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घराची पाहणी केली असता बेडरूममधील कपाटे आणि ड्रॉवर फोडल्याचे आढळले.

चोरट्यांनी कपाटांमधून चार सोन्याच्या बांगड्या, चार सोन्याच्या कुड्या, सोन्याच्या साखळ्या आणि अंगठ्या तसेच चांदीचे नाणे आणि चांदीची कुंकवाची डबी चोरून नेली. याशिवाय सोन्याच्या रंगाचे ‘टायटन’ कंपनीचे मनगटी घड्याळ तसेच तांबे-पितळेची जुनी भांडी आणि दिवेही लंपास करण्यात आले.

Advertisement

तक्रारदारांच्या प्राथमिक अंदाजानुसार, चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे वजन सुमारे 100 ग्रॅम, तर चांदीच्या वस्तूंचे वजन सुमारे 25 ग्रॅम आहे. मात्र, संबंधित बिलांची पूर्ण पडताळणी झाल्यानंतर चोरीला गेलेल्या ऐवजाची अचूक किंमत स्पष्ट होणार आहे.

या घटनेनंतर प्राथमिक चौकशी आणि तांत्रिक पडताळणी पूर्ण करून पणजी पोलिसांनी 26 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 1 वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिस उपनिरीक्षक सूरज मडगावकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.