पणजी मनपाचा आज फैसला
आज मतमोजणी : दुपारी 12 पर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता
पणजी : पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज शुक्रवार 13 मार्च रोजी होणार असून एकूण 69 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडीयममध्ये सकाळी 8 वा. मतमोजणी सुरु होणार आहे. मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान मतपत्रिकेद्वारे झाले असून सर्व निकाल दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात गट आणि उत्पल मनोहर पर्रीकर यांच्या गटात सत्तेसाठी चुरस असून पणजीची सत्ता कुणाकडे जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मोन्सेरात, पर्रीकरांची प्रतिष्ठा पणाला
पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 69.07 टक्के मतदान झाले आहे. निवडणूक पक्षीय चिन्हांवर झालेली नाही, तरीही दोन्ही गट भाजपचेच आहेत. मोन्सेरात व पर्रीकर या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पर्रीकरांची प्रचारात होती आघाडी
उत्पल पर्रीकरांच्या ‘आम्ही पणजीकर’ गटात सुरेंद्र फुर्तादो, दत्तप्रसाद नाईकसारखे नेते आहेत. पर्रीकरांच्या गटाला आम आदमी पार्टी, काँग्रेसने मदत केली आहे. प्रचारासाठी मिळालेल्या अवघ्या काही दिवसांत उत्पल पर्रीकर यांच्या गटाने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून आले होते. मोन्सेरात गटातील उमेदवारांसोबत खूद्द मंत्री मोन्सेरातही फिरलेले दिसले नाही. उत्पल पर्रीकर गटाला 10 ते बारा जागा मिळाल्यास विधानसभा पणजी मतदारसंघाचे चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही.
पणजीची समीकरणे बदलणार?
मागील महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या मतदानापेक्षा यावेळी झालेल्या मतदानात एक टक्का घट झाली आहे. त्यामुळे सर्वच समीकरणे बदलू शकतात. याचा फायदा कुणाला होणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या निकालातून येत्या विधानसभा निवडणुकीतील पणजी मतदारसंघाची समीकरणेही बदलण्याची शक्यता आहे.